कोल्हापूर : कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर जाण्याच्या निर्णयावरून ठाकरे गटातील मतभेद शुक्रवारी उफाळून आले. शिंदे गटाबरोबर जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला असताना त्यास जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी ‘मातोश्रीशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटाबरोबर कुठल्याही प्रकारची राजकारणाची युती अशक्य आहे,’ अशी तोफ डागली आहे. तर यावरून शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके पवार यांच्यावर हल्ला चढवला आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत सोयीची राजकीय समीकरणे मांडण्यात आली आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक गेले आहेत. तर एकनाथ शिंदे गटाबरोबर राहण्याची भूमिका काल ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील, जिल्हा अध्यक्ष विजय देवणे, शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी घेतला होती. त्यावरून ठाकरे गटातील बेदिलीला आज तोंड फुटले.
भाजप, शिंदेंसोबत युती नाही
दुसरे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिंदे गटाबरोबर जाण्यास तीव्र विरोध केला आहे. पवार यांनी राजकारणामध्ये युती आघाडी या नेहमीच होत असतात. मात्र सत्तेसाठी दलबदलूपणा हा दुर्देवी आहेच. उद्धव ठाकरे सारख्या संयमी नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तालोभी भाजपाशी युती करणाऱ्या शिंदे गटाबरोबर कुठल्याही निवडणुकीमध्ये समझोता हा कदापि मान्य होणार नाही. शिंदे गटाबरोबर कधीही कुठल्याही प्रकारची युती कोल्हापुरात केली जाणार नाही, असे म्हटले आहे.
पवारांनी त्यांना विचारावे
यावर सत्यजित पाटील सरूडकर म्हणाले, आमची आमची शिव शाहू आघाडी ही पक्षविरहित आहे. यामध्ये ठाकरे गटाने जाण्याचा निर्णय वरिष्ठांशी चर्चा करून घेतला आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी ही निवडणूक पक्षीय राजकारणाची नाही, असे नमूद करून संजय पवार हे किती वेळा धनुष्यबाणाशी प्रामाणिक राहिले, असा खोचक प्रश्न उपस्थित केला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी विरोधी गटाकडून शिवसेनेच्या शिंदे गटाचे संजय मंडलिक व ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे निवडणूक लढत आहे. संजय पवार यांनी त्यांना एकत्र कसे आलात, असा प्रश्न विचारावा, असा टोला लगावला आहे.
हेही वाचा – कोल्हापूरातील शासकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडले
पत्रकार परिषदेला दांडी
दरम्यान, पवार यांनी हे पत्र काढल्यामुळे दुसरे जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख मोदी यांनी शिव शाहू आघाडीच्या पत्रकार परिषदेला दांडी मारली.