कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण पूर्ण भरले असून दूधगंगा या सर्वात मोठ्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे पूरस्थितीत वाढ होऊ लागली असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्याला पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. पावसामुळे राधानगरी धरण काल पूर्ण भरले होते. पहिला दरवाजा सकाळी उघडण्यात आला होता. सायंकाळी पाच दरवाजे उघडले होते. तर शुक्रवारी आणखी एक दरवाजा उघडण्यात आला पण सायंकाळी त्यातील एक दरवाजा बंद करण्यात आल्याने सध्या पाच दरवाजे उघडले असून त्यातून साडेतीन हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे. तर सर्वात मोठ्या दूधगंगा (काळमवाडी) धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी सांडव्यावरून साडेतीन हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.
हेही वाचा – कोल्हापूर : राष्ट्रपती रविवारी वारणेच्या दौऱ्यावर; पाऊस झेलत शासकीय यंत्रणा कार्यरत
हेही वाचा – पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले
शासन सतर्क
दोन्ही धरणातून अधिक पाणी वाहू लागल्याने पूरस्थितीत वाढ होत चालली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुराचा फटका बसलेल्या भागातील लोकांनी स्थलांतर करण्याचे आवाहन शुक्रवारी केले.