राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या विरोधात आहे, असा अपप्रचार केला जात आहे. पण राज्यातील युती सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, तर आता कर्ज माफ केल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जच काढावे लागू नये, असा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्स या कारखान्याने दुष्काळग्रस्तांसाठी दहा लाखांचा निधी मुख्यमंत्री दुष्काळग्रस्त सहायता निधीला अर्पण केला. त्या वेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील होते. कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, राहुल घाटगे, धीरज घाटगे उपस्थित होते. त्रिमूर्ती सेंद्रिय खतांच्या पोत्यांचे अनावरण आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री पाटील म्हणाले, की राज्यात सत्तांतर झाले, तेव्हा साखर कारखानदारी भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेली होती. कारखाने काढायचे, ते बंद पाडायचे आणि मातीमोल किमतीत विकायचे असा प्रकार सुरू होता. मात्र, हे चित्र बदलण्यासाठी गेल्या सरकारने पंधरा वर्षांत जेवढी मदत केली नव्हती, त्याहून अधिक मदत युती सरकारने केली. या वर्षी २२ हजार कोटी रुपयांची एफआरपी जाहीर केली गेली. त्यापकी केवळ १७५ कोटी रुपयांचे देणे शिल्लक आहे.
राज्यातील ३३ हजार गावांत जलयुक्त शिवार पूर्ण करणार आहे. मागेल त्याला विहीर, मागेल त्याला शेततळे अशा योजना राबवून शेतकऱ्याला मुबलक प्रमाणात पाणी मिळाले, तर शेतकरी कर्ज घेणारच नाही.
प्रास्ताविकात माधवराव घाटगे म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रातील पहिला खासगी तत्त्वावरील गुरुदत्त साखर कारखाना उभारताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, गेल्या ११ वर्षांत कारखान्याने दरवर्षी चढत्या क्रमाने गाळप केले आहे. शेतकऱ्यांना सुमारे १५ ते २० आजारांवर मोफत औषधोपचार करण्याची योजना विचाराधीन आहे.
उसातील नसíगक पाण्यावरच चालणारा हा एकमेव कारखाना असल्याचे त्यांनी नमूद केले. गुरुदत्त शुगर्सने उच्चांकी गाळप करून १३.६२ उताऱ्याने देशात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल बहुजन विकास आघाडीमार्फत अध्यक्ष माधवराव घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. आभार संचालक बबन चौगुले यांनी मानले.

गुरुदत्त कारखान्याच्या सेंद्रिय खतांच्या पोत्यांचे पूजन करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, राहुल घाटगे, धीरज घाटगे, आमदार उल्हास पाटील, सुरेश हाळवणकर आदी.

Story img Loader