कोल्हापूर : इचलकरंजीच्या दूधगंगा सुळकुड पाणी योजनेबाबत शासनाकडे मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्यानंतर मंगळवारी कागल तालुक्यातील महिलांच्या उपोषणाची सांगता झाली.
इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर झाली आहे. या पाणी योजनेच्या मागणीसाठी इचलकरंजीतील आम्ही सावित्रीच्या लेकी या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केले होते. तर या योजनेला विरोध करत कालपासून कागल तालुक्यातील आम्ही जिजाऊंच्या लेकी या मंचाखाली सुळकुड बंधाऱ्यावर आंदोलन सुरू केले होते.
हेही वाचा >>>चांगले रस्ते वा हाडांचे दवाखाने द्या; कोल्हापुरात अनोख्या मागणीचा मोर्चा
दरम्यान, या प्रश्नी आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी लक्ष घातले. त्यांनी विधिमंडळातून आंदोलक महिलांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. कागल सुळकुड योजना होऊ दिली जाणार नाही. इचलकरंजीला पर्यायी पाणी योजना दिली जाईल आणि या प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्याशी पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री माने,सरपंच वीरश्री जाधव यांनी संपर्क साधला. या महिलांनाही मंत्रालयातील बैठकीसाठी पाचारण करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, युवराज पाटील, भैया माने यांच्यासह आंदोलन उपस्थित होते.