कोल्हापूर : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटी आणि मागण्यांना काहीही अर्थ नसतो. लोकांना दाखवण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, असा पलटवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे बोलताना केला.
राज्यात गुंडगिरी, गुन्हेगारीच्या घटना वाढल्याने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकार बरखास्त करावे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली. तर काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाने राज्यपालांची भेट घेऊन याच मागणीचे निवेदन दिले. याबाबत प्रश्न उपस्थित केला असता पवार यांनी वरील प्रमाणे उत्तर दिले.
हेही वाचा – बाबा सिद्दीकींचा अजित पवार गटात जाहीर प्रवेश; म्हणाले, “४८ वर्षांनी…”
राज्य सरकार बरखास्त करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. १४५ आमदार असतील तर सत्ता स्थापन करता येते. येथे तर २०० आमदारांचा पाठिंबा आहे. विरोधात असताना आम्ही अशा मागण्या करत होतो पण त्यातून फारसे काही साध्य होत नाही, असेही त्यांनी फटकारले.
अलीकडील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ घेत अजित पवार म्हणाले, त्यांच्या – त्यांच्यातील वादातून या घटना घडल्याचे दिसतात. तुमच्यातील मतभेद संपवले असे दाखवण्यासाठी फेसबुक लाईव्ह केले जाते. ते संपल्यानंतर गोळीबार केला जातो. यात पोलिसांचा काय दोष आहे. पोलीस ठाण्यामध्ये ज्याने गोळीबार केला आणि झाला त्या दोघांकडे रिव्हॉल्व्हर होते. ही घटना कशातून घडली याचा शोध सुरु आहे. कालची घटना म्हणजे उगीचच कोणी साप साप म्हणून जमीन थोपटण्याचा प्रकार आहे. गुंड गुंडांना मारत आहेत येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही.
मुंबईमध्ये आज अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. मात्र ती नावे इथे मी कोल्हापुरात सांगितली की लगेच तुमच्या बातम्या सुरू होतात. मुंबईत गेल्यानंतर त्याचे स्पष्टीकरण होईलच, असेही पवार म्हणाले.