कोल्हापूर : मनाची श्रीमंती असेल तर त्यातून कोणतेही सत्कार्य घडवता येते. सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील प्रगतशील शेतकऱ्यांने याच दातृत्वाचा दाखला देत आपल्या शेतात राबणाऱ्या शेतमजुरांना विमान, रेल्वेचा प्रवास करून तिरुपती बालाजीचे दर्शन घडवले आहे. हे अनोखे पर्यटन पाहून श्रमिकांचे चेहरे आनंदाने उजळले गेले
श्रीमंती तर अनेकांकडे असते. पैश्याबरोबरच माणसं, मान कमावतो ती खरी मनाची श्रीमंती ! अशा श्रीमंत माणुसकीचे दर्शन शेखर पाटील यांनी घडवले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा. हिरवीगार शेती पिकाची यासाठी त्याचे प्रयत्न असतात. काळ्या मातीतील या प्रयत्नांना खरी साथ मिळते ती अहोरात्र राबणाऱ्या शेतमजुरांची. अशा या गरीब शेतमजुरांनाही आनंदाचे चार क्षण मिळावेत यासाठी सैनिक टाकळी येथील प्रगतशील शेतकरी शेखर सदाशिव पाटील यांनी एक अनोखा उपक्रम राबवला.
अशी सुचली कल्पना
त्यांच्याकडे गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या २५ शेतमजुरांना त्यांनी तीर्थक्षेत्रांना भेटी देणारी सहल आयोजित केली. शिरोळ येथील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सुनंदा चंद्रकांत पाटील यांनी शेखर पाटील यांना शेतमजुरांना विमानाने बालाजी दर्शन घडवून आणण्याची संकल्पना कथन केली. स्वतःही शेतमजुरांसोबत येण्याची तयारी त्यांनी दर्शवली. हि भूमिका शिरोधार्य मानत शेखर पाटील यांनी सहकुटुंब शेतमजूर व त्यांचे मुले यांच्यासोबत प्रवास करण्याचे निश्चित केले.
हवाई अनुभव
ही सर्व मंडळी बेळगाव येथील विमान तळावरून तिरुपती बालाजीची हवाई यात्रा घडवली. तेथे देवदर्शन घेतले. आजूबाजूचा परिसर, निसर्ग न्याहाळला. परतीच्या प्रवासात झुक झुक आगीनगाडींत बसले. बहुतांशी शेतमजुरांना उभ्या आयुष्यात विमान आणि रेल्वेचा प्रवास पहिल्यांदाच करण्याची संधी मिळाली. खेरीज प्रवासात अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी, घटना पाहायला मिळाल्या. स्वाभाविकच शेतमजुरांचे डोळे आनंदाने पाणावले. जीवन सार्थकी लागले अशा कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करताना ते गहिवरले.