कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी बहुजनांचे रयतेचे स्वराज्य निर्माण केले. औरंगजेब हा छत्रपती शिवाजी महाराज, बहुजनांच्या स्वराज्याचा शत्रू होता. शिवाजी महाराजांचा शत्रू तो हिंदुस्थानी मुसलमानांचा शत्रूच औरंगजेबाचे उदातीकरण होऊच शकत नाही, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे केले.
कोल्हापुरात नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवाजी महाराज यांना मुस्लिम समाजाविषयी कधीच आकस नव्हता. मुस्लिम समाजाचीही शिवाजी महाराज यांच्यावर तितकीच गाढ श्रद्धा होती. शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक २२ मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते.
७५ वर्षांपूर्वी हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता असल्याच्या मातृत्वाच्या भावनेतूनच हिंदुस्तानी मुस्लिम समाज या मातीत राहीला. सामाजिक विद्वेषातून दंगे-धोपे आणि दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच असल्याने कोणत्याही बहकाव्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडू देवू नका. चिथावणीखोरांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.