कोल्हापूर : रत्नागिरी – हैदराबाद महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना हजारो दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षावर कुऱ्हाड चालवली जात आहे. निसर्गाच्या या अमूल्य ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी वृक्षांचे स्थलांतर अथवा पुनर्लागवड करण्यात यावे, अशी मागणी येथील नेचर कन्सर्वेशन सोसायटीने बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.

याबाबत त्यांनी येथील मुख्य वनसंरक्षक रामानुजन व राष्ट्रीय महामार्ग परियोजनेचे बर्डे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष तबरेज खान, सल्लागार, कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक स्वप्नील पवार, धनंजय जाधव, विवेक कुबेर, गुनकली भोसले, संतोष शिरगावकर, राहूल गायकवाड, अमोल जाधव आदींनी चर्चेत भाग घेतला.

परिसंस्थेवर आघात
त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, रत्नागिरी – हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होत असताना आंबा येथून कोल्हापूर कडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. ५० ते २०० वर्ष आयुर्मान असलेल्या देशी वृक्षांवर कुऱ्हाड चालवली जात आहे. वृक्ष असण्याचे अनेक फायदे आहेत. शिवाय कीटक, फुलपाखरे, पक्षी, सरीसृप, वन्य प्राणी यांच्या अन्न, निवाऱ्यासाठी वृक्ष गरजेचे आहेत. शेकडो मोठाले वृक्ष जमीनदोस्त होत असल्याने काही तासातच ही परिसंस्था उध्वस्त होत असल्याने याचे जतन केले पाहिजे. याकामी आम्ही जबाबदारी घेत आहोत. शासकीय यंत्रणेने याकडे डोळसपणे लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी वृक्षतोड झाल्याने उंच झाडे कशी कोसळली आहेत याची छायाचित्रे, तपशील दिला.

प्रदेशनिष्ठ वृक्षांचे जतन
या भागात ऑर्किड सह काही प्रदेशनिष्ठ वृक्ष आहेत. त्यांचे जतन करण्यात यावे अशी मागणी ही करण्यात आली असता त्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन रामानुजन यांनी दिले.

Story img Loader