सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या नियोजन आराखड्यावरून सिध्देश्वर मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्यात सध्या सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांची मुलाखत सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाल्यामुळे विश्व िहदू परिषदेच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या अध्यक्षाने आकाशवाणी केंद्राच्या कार्यक्रम अधिकाऱ्यालाच धमकावल्याचा प्रकार घडला.
याप्रकरणी विश्व िहदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उदय वैद्य यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. राज्यात व केंद्रात आमचे सरकार असताना आकाशवाणी केंद्रावर जिल्हाधिकारी मुंढे यांची मुलाखत कशी प्रसारित झाली, असा जाब विचारत, याबाबत केंद्रीय नभोवाणीमंत्री आणि त्यांच्यापेक्षा आणखी वरिष्ठांकडे तक्रार करून तुमचे बघून घेऊ, अशी धमकी डॉ. वैद्य यांनी आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सुनील शिनखेडे यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली, अशी तक्रार स्वत शिनखेडे यांनी पोलिसांत नोंदविली. त्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी विश्व िहदू परिषदेच्या जिल्हाध्यक्षावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेसाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली जिल्हाधिकारी मुंढे यांनी घटना प्रतिसाद प्रणालीनुसार आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी हाती घेण्याचे ठरविले आहे. परंतु मंदिर समितीला जिल्हाधिकारी मुंढे यांचा आराखडाच मान्य नाही. तर मुंढे हेदेखील आपल्या कायदेशीर भूमिकेवर ठाम आहेत. या प्रश्नावर पालकमंत्री विजय देशमुख यांनी मंदिर समितीच्या बाजूने भूमिका घेत जिल्हाधिकारी मुंढे यांच्याच विरोधात आंदोलन सुरू केले आहे. मोर्चा व ‘सोलापूर बंद’ नंतर आता येत्या रविवारी शहरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचे मंदिर समिती व पालकमंत्री देशमुख यांनी जाहीर केले आहे. जिल्हाधिकारी मुंढे यांच्यावर विविध आरोपही केले जात आहेत.
या पाश्र्वभूमीवर मुंढे यांची सिध्देश्वर यात्रा नियोजन आणि जिल्हा प्रशासन या विषयावर मुलाखत गेल्या ८ व ९ डिसेंबर रोजी सोलापूर आकाशवाणी केंद्रावर प्रसारित झाली होती. त्यास हरकत घेत वििहपचे डॉ. वैद्य यांनी थेट आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी शिनखेडे यांना धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा