कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलन करताना न्यायालयीन कामकाजापासून दूर न राहण्याबाबत बंद पत्र उच्च न्यायालयात सादर करण्याचे सर्व अधिकार जिल्हा बार असोसिएशनला देण्याचा ठराव आज झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
कोल्हापूर खंडपीठ आंदोलनाचा एक भाग म्हणून न्यायालयीन कामकाजापासून दूर राहून निषेध आंदोलनाचा मार्ग खंडपीठ कृती समितीने यापूर्वी अनेक वेळा स्वीकारला होता. मात्र उच्च न्यायालयाने अशा पद्धतीने आंदोलनाबाबत बार असोसिएशनला नोटीस देऊन न्यायालयीन कामकाजापासून दूर न राहण्याचे बंद पत्र देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २१ ऑक्टोबर २०१५ रोजी असोसिएशनने बंद पत्र न देण्याचा ठराव केला होता. आंदोलनात सहभागी रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आदी जिल्हा बार असोसिएशननेही तसा ठराव दिला होता. मात्र २७ नोव्हेंबर रोजी कृती समितीने या ठरावाबाबत पुनर्विचार करण्याची मुभा देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली होती. न्यायालयातून त्याला मान्यता दिली. याबाबत आज बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा झाली. बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
या सभेपुढे सदस्या कोमल राणे यांनी पूर्वीचा ठराव रद्द करण्याचा ठराव मांडला, त्यास अ‍ॅड. राजू किंकरे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमुखी मान्य करण्यात आला.
अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी यापुढे बार असोसिएशन जो निर्णय घेईल त्याला सर्व सदस्यांचा एकमुखी पािठबा राहील, असा ठराव मांडला. त्यास अ‍ॅड. माणिक मुळीक यांनी अनुमोदन दिले. हा ठरावही एकमुखी मान्य करण्यात आला.
अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, आजच्या सभेत जो निर्णय घ्याल त्याचा परिणाम सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन व आंदोलनावर होणार आहे. कोणाच्या समाधानासाठी आंदोलन नसून खंडपीठ हा मुख्य हेतू आहे. २००९ ते २०१५ पर्यंत आपले आंदोलन एका वळणावर आले आहे. माजी न्यायमूर्ती मोहित शहा यांचा अहवाल पाहिला तर आपल्या आंदोलनाचा विजय झाला असे म्हणावे लागेल. त्यामुळे आता जिल्हा बार असोसिएशनचे संचालक मंडळ जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी आपण ठाम राहूया.
सचिव अ‍ॅड. रवींद्र जानकर यांनी स्वागत केले. या वेळी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. मििलद जोशी, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. महादेवराव अडगुळे, अ‍ॅड. संभाजी पवार, अ‍ॅड. विठोबा जाधव, अ‍ॅड. विजयकुमार ताटे, अ‍ॅड. सुशीला कदम, अ‍ॅड. सुश्मित कामत, अ‍ॅड. धनश्री चव्हाण आदींसह बार असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.
आज कृती समितीची बैठक
उद्या (गुरुवारी) खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी खंडपीठ कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी दिली.

Story img Loader