कोल्हापूर : पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडलेल्या टोमॅटोला आता कवडीमोल दर मिळू लागला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शिरोळ तालुक्यात टोमॅटो पिकावर नांगर फिरवला जाऊ लागला आहे. सुभाष खुरपे या शेतकऱ्याने अडीच एकरातील टोमॅटोची बाग जमीनदोस्त करीत संतापाला वाट मोकळी करून दिली आहे.
गेले दोन महिने टोमॅटो दराला बरकत आली होती. शेतकऱ्यांनी टोमॅटोच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून शिवम ज्वारी जातीच्या गावरान टोमॅटोची लागवड १० एकरहून अधिक जागेत केली आहे. योग्य नियोजन करून टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले. मात्र, टोमॅटोला प्रतिकिलो ५ ते १० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी पिकलेला मालासह टोमॅटोची रोपे शेतकरी तोडून टाकत आहेत. दर घसरल्याने झालेले कर्ज कसे फेडायचे या चिंतेत शेतकरी आहेत. करोना, अतिवृष्टीनंतर बदललेल्या हवामानाचा टोमॅटोउत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
अपेक्षा फोल ठरल्या
जुलै महिन्यात टोमॅटोला सर्वात उच्चांकी २५० रुपये दर मिळत होता. तो दिवाळीपर्यंत राहील अशी अपेक्षा असल्याने जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात पाऊण लाख रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. आता बाजारात आवक वाढल्याने दर घसरला आहे. कामगारांचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो पीक काढून टाकले आहे, असे अकिवाट येथील सुभाष खुरपे यांनी गुरुवारी सांगितले.