कोल्हापूर : ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा जयघोषात करवीर नगरी शिवतिथी दिनी शिवजयंती मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. प्रतिमापूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणुका, ढोल-ताशांचा गजर, चित्तथरारक मर्दानी खेळ अशा उपक्रमामुळे वातावरण शिवमय झाले होते.
शिवजयंती निमित्ताने तरुण मंडळे, तालीम, सामाजिक संघटना यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासून गडावरून शिवप्रेमींनी शिवज्योत आणल्या जात होत्या. दुपारी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. सायंकाळी भव्य मिरवणुका निघाल्या.
संयुक्त मंडळांवर भर
यावर्षी मंडळांनी संस्था पातळीवर शिवजयंती साजरी करण्यापेक्षा परिसरातील मंडळांनी एकत्रित येऊन शिवजयंती करण्यावर भर दिला. संयुक्त मंडळांची शिवजयंती लक्षवेधी तसेच भव्य स्वरूपाची ठरली. भव्य प्रमाणातील व्यासपीठ आणि त्यावर शिवकालीन प्रतिमा यामुळे शिवजयंती सोहळय़ाला वेगळी उंची मिळाली.
मिरवणुकांचे आकर्षण
मंगळवार पेठेतील १३ तालीम संस्था, १०० हून अधिक तरुण मंडळ हे १९७० पासून संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू मंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळा केला जातो. श्रीमंत मधुरिमा राजे छत्रपती, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते जन्मकाळ सोहळा झाला. तेथील सर्व तालीम संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. सायंकाळी मिरजकर तिकटी चौकातून शिवछत्रपतींच्या १५ फूट उंचीच्या अश्वारुढ प्रतिमेची मिरवणूक निघाली. घोडे, उंट, मावळे, सजीव चित्र, हलगी ताफा, लेझीम, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा