लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा वावर शनिवारी वाढला. गावागावात तो फिरत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. त्याचा उपद्रव लक्षात घेऊन वन विभागाचे पथक हत्तीला वन क्षेत्रात पाठविण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करत आहे.

चिंचणे,कामेवाडी,कुदनुर,कितवाड, कालकुंद्री आदी भागात आज टस्कर हत्तीचा वावर दिसून आला. सध्या उस गाळप हंगाम सुरु असल्याने या भागात चार-पाच कारखान्याचे ऊस तोडणी कामगार फडात तोडणी करत आहेत. टस्कर हत्तीचा वावर असल्याने उसात जायचे कसे अशा कारणाने ग्रामस्थ, तोडणी कामगार भयभीत झाले आहेत.

आणखी वाचा-राहुल गांधी जात असलेल्या राज्यात इंडिया आघाडी तुटत आहे; शिवराज सिंह चव्हाण यांचा आरोप

ग्रामपंचायतीच्या ध्वनिक्षेपणावरून लोकांनी शिवारात जाऊ नये, हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केले जात आहे. तरीही काही दांडगट प्रवृत्तीचे लोक, ऊस तोडणी कामगार त्यांना दगडाने मारण्याचा उपद्व्याप करताना दिसत आहेत. त्यामुळे वाटेने जाणाऱ्या हत्तीने बराच वेळ उसाच्या फडातच मुक्काम ठोकला आहे. परिणामी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर ऊसाच्या फडातून हत्ती बाहेर कधी येणार? तो वनक्षेत्रात कधी जाणार याचीच तासंतास वाट बघण्याची वेळ आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत तस्कर हत्ती उसाच्या फडातून बाहेर न आल्याने गोची झाली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tusker elephant nuisance increased in chandgarh taluka mrj
Show comments