कोल्हापूर : कागल तालुक्यामध्ये चार वर्षांमध्ये केलेल्या सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या बांधकाम विषयक कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतची नेमकी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत या मागणीसाठी बांधकाम विभागाचे उपअभियंता दीपक आनंदराव कुराडे यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. याबाबत मूळ माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सन २०२९- २३- २४ या कालावधीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने कागल तालुक्यामध्ये २५१५ कोटी रुपयांची विकास कामे मूलभूत सुविधा योजना अंतर्गत केली. यातील अनेक कामे एकदा केली असताना त्याचे दोनदा बिल काढण्यात आले आहे. अनेक बाबतीत आर्थिक घोटाळे झाले आहेत, असे कागल मध्ये अभियंता म्हणून काम केलेले कुराडे यांचे म्हणणे आहे. त्यावरून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याची माहिती अधिकारात माहिती मागवली. ती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.
हेही वाचा >>>राजू शेट्टी – रविकांत तुपकर मतभेद शिगेला; स्वाभिमानीत आणखी एका फुटीची बीजे
त्यानंतर कुराडे अपिलात गेल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी त्यांना २ लाख ६३ हजार रुपयांच्या पानांच्या माहितीसाठी ५ लाख ८२ हजार रुपये भरावेत असे कळविण्यात आले. ही रक्कम त्यांनी चलनांने भरली. सव्वा महिन्यानंतर एक लाख पानांचे २६ गट्ठे त्यांना देण्यात आले. परंतु त्यातील माहिती तपासून पाहिली असता ती दिशाभूल करणारी असल्याचे दिसून आले. ज्या विषयावरून माहिती मागवली ती देण्याचे नाकारले असून खरी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप करून कुराडे यांनी वस्तुस्थितीजनक माहिती मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा निर्धार केला.