कोल्हापूर : खोटी बिले देऊन अथवा घेऊन शासनाची करोडो रुपयांचा महसूल हानी करणाऱ्या करदात्यांविरुध्द शासनाने घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाच्या कार्यालयातील अन्वेषण शाखेमार्फत शासनाची १४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याचे राज्यकर सहआयुक्त (प्रशासन) सुनीत थोरात यांनी सोमवारी सांगितले आहे.
मे. बालाजी एन्टरप्राइजेस, मे. तिरुपती मेटल, मे. तिरुपती ट्रेडर्स, मे. दुर्गा ट्रेडिंग, मे. गणपती ट्रेडर्स, मे. कृष्णा एन्टरप्राइजेस या कंपन्यांवर अन्वेषण शाखेमार्फत छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान करदाते मे. तिरुपती मेटलचे मालक राम दिलीप बैरानी आणि मे. बालाजी एन्टरप्राइजेसचे मालक सुरेश दिलीप बैरानी या दोन भावांनी आपल्या नातेवाईक व कामगार यांच्या नावावर मे. तिरुपती ट्रेडर्स, मे. दुर्गा ट्रेडिंग,आणि मे. कृष्णा एन्टरप्राइजेस या बोगस कंपन्या सुरु केल्या आहेत, असे निदर्शनास आले. मे. तिरुपती मेटल व मे. बालाजी एन्टरप्राइजेस या दोन्ही प्रकरणांमध्ये वस्तूंच्या प्रत्यक्ष खरेदीशिवाय गुजरात राज्यातील भावनगर व अहमदाबाद येथील बनावट कंपन्यांकडून १४० कोटी रुपयांची खोटी बिले घेऊन २५.३५ कोटी रूपयांची वजावट प्राप्त केली आहे. दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी न करता बीजके किंवा बिले स्वीकारून शासनाची मोठ्या प्रमाणात महसूल हानी केल्याचे उघडकीस आले आहे.