लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने येथे सापळा रचून अटक केली आहे. धाकलू बाळू शिंदे (वय ६५, हेरे) व बाबू सखाराम डोईफोडे ( ५७, बांदराई धनगरवाडा) अशी चंदगड तालुक्यातील या दोघांची नावे आहेत.

दोघेजण बिबट्याचे कातडे विकण्यासाठी कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानात येणार असल्याची माहिती शिपाई योगेश गोसावी यांना मिळाली होती. त्यानुसार तेथे सापळा रचण्यात आला होता. तेथे बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन आलेल्या वरील दोघांना पोलिसांनी पकडले.

त्यांच्याकडील बिबट्याचे कातडे जप्त केले. जुना राजवाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांनी बिबट्यासह आणखी कोणाची शिकार केली आहे का, वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Story img Loader