मोटारीच्या चालकाचा ताबा सुटून गाडीची शेजारच्या वडाच्या झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोन ठार तर अन्य सात गंभीर जखमी झाले. शुक्रवारी सकाळी सात वाजता झालेल्या अपघातात माळशिरस बार असोसियशनचे अध्यक्ष विलास नामदेव मगर (वय ४४, रा. निमगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) व कु. इंद्रायनी अनिल जवळकर (वय १५, रा. लातूर शहर) हे ठार झाले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गोगवे (ता. शाहूवाडी) येथे अपघात घडला. गाडीतून पुणे, सोलापूर, लातूर येथील नातेवाईक प्रवास करत होते. रात्रभर प्रवास करून कंटाळल्याने ड्रायव्हरच्या डोळ्यावर झापड आल्याने हा अपघात झाला असावा असा पोलिसांचा कयास आहे.
पुणे येथून दोन गाडय़ा कोल्हापुरातून कोकण माग्रे गोव्यास जात होत्या. दोन गाडय़ा बांबवडे सोडून पुढे गेल्यावर इनोव्हा गाडी (एमएच१२-७१७२) च्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी वडाच्या झाडावर जाऊन धडकली. गाडीचा वेग खूप असल्याने गाडीतील विलास मगर व इंद्रायनी जवळकर हे दोघे जागीच ठार झाले. तर सुवर्णा विलास मगर, साक्षी विलास मगर, राज विलास मगर व ओम विलास मगर, ओमकार अनिल जवळकर व नीता अनिल जवळकर हे गंभीर जखमी झाले. चालक मनोज दीपक शिरामे (राजीवनगर, पुणे) किरकोळ जखमी झाले. या गाडीबरोबर प्रवास करणारी गाडी पुढे आंबा घाटापर्यंत गेली होती. त्यांनी कोल्हापूरकडे येणाऱ्या वाहनाकडे चौकशी केली असता इनोव्हा गाडीचा अपघात झाल्याचे त्यांना सांगताच त्या गाडीतील व्यक्ती घटनास्थळी आले. मलकापूर येथे मृतांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह शुक्रवारी दुपारी त्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अनिल गाडे करत आहेत.

Story img Loader