बेळगावहून गणेशमूर्ती घेऊन येत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजी येथील मंगळवार पेठ युवा मंचचे दोन गणेशभक्त कार्यकत्रे जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर यमकनमर्डी (जि. बेळगाव) गावानजीक घडला. मंगेश बाळासाहेब गायकवाड (वय ३२, रा. होळीकट्टा परिसर) व सुनील राजाराम माने (वय ३०, रा. संतुबाई गल्ली) अशी मृतांची नावे आहेत, तर पाचजण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच मंगळवार पेठ परिसरात शोककळा पसरली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नारायण चित्रमंदिर परिसरात असलेल्या मंगळवार पेठ युवा मंच गणेशोत्सव मंडळाचे कार्यकत्रे बुधवारी बेळगाव येथे श्रींची मूर्ती आणण्यासाठी गेले होते. एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये १६ फूट उंचीची राधाकृष्ण रुपातील मूर्ती घेऊन ते इचलकरंजीकडे परतत होते. ट्रॉलीमध्ये सात ते आठजण होते, तर ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या सुमोमध्ये काहीजण होते.
पुणे-बेंगलोर महामार्गावरील कर्नाटक हद्दीतील यमकनमर्डी गावानजीक पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने ट्रॉलीला जोराची धडक दिली. ट्रॅक्टरमध्ये बसलेले गायकवाड आणि माने हे ट्रकच्या धडकेमुळे रस्त्यावर कोसळले. या दोघांनाही गंभीर इजा झाल्याने ते जागीच ठार झाले. तर शाहरुख पठाण, राहुल काळे, संतोष जाधव, अक्षय सावंत, मंगेश मस्कर हे पाचजणही जखमी झाले. धडकेनंतर ट्रकही काही अंतरापर्यंत जात खड्डय़ात कोसळला.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच अन्य कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे इचलकरंजी परिसरावर शोककळा पसरली होती. मंगळवार पेठेतील काही कार्यकत्रे व नातलग तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. गुरुवारी सकाळी गायकवाड आणि माने यांचे पाíथव शहरात आणण्यात आले.  दोघांवरही इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा