कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यात गुरुवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले.

गेली चार दिवस उन्हाची तीव्रता वाढली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी वादळी वारे, ढगांचा गडगडाट होत पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. माळरानावर कोमेजून जाणाऱ्या पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. हातकणंगले, कागल, आजरा, करवीर तालुक्यातील काही भागांत जोरदार सरी कोसळल्या. साके, व्हनाळी (ता.कागल) परिसरात अर्धा तास पाऊस पडत होता.

दुचाकींचे नुकसान

पावसामुळे हवेत गारव्याबरोबरच ऊस पिकाला समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. उसाची भरणी तसेच भाताची शेती तयार करण्यासाठी हा पाऊस पूरक झाल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे. पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीजवळील लक्ष्मी टेकडीजवळ झाड कोसळल्याने दुचाकींचे नुकसान झाले. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

कागलला झोडपले

कागल शहरासह परिसरात गुरुवारी दुपारी वळीवाच्या पावसाने विजांच्या कडकडाटासह अक्षरश: झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस आल्याने लक्ष्मी टेकडी जवळ दुचाकी वाहनधारक झाडाखाली आपले वाहन लावून थांबले होते. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड त्या वाहनांच्यावरच कोसळले. यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कागल परिसरात विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून दोन तास झोडपून काढले. या पावसात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. सकल भागात पाण्याचा निचरा न झाल्याने काही परिसर थोड्या काळासाठी जलमय झाला होता. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सुसाट्याच्या वारा सुटून विजांच्या कडकडांटसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

दरम्यान पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतातील मशागतीला वातावरण पोषक मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या वळीव पावसात येथील बीएसएनएल ऑफिस जवळ असलेल्या बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर काही ठिकाणी मोठ्या झाडांची पडझड झाली. मागील काही दिवसापासून परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा ३८ अंशावर गेल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. दमदार पावसामुळे सर्वत्र गारवा पसरला.