माजी महापौर सुनील कदम यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याच्या विषयावरून शुक्रवारी झालेल्या महासभेत सत्तारूढ आणि विरोधक यांच्यात खडाजंगी उडाली. कदम यांचा महापालिकेतील प्रवेश रोखण्याचा कसोशीने प्रयत्न सत्तारूढ गटाने केला. त्यासाठी झालेल्या मतदानात ४१ मते सत्ताधाऱ्यांची होती तर विरोधात ३० मते पडली. ३ सदस्य तटस्थ राहिले. या ठरावाच्या निमित्ताने महापालिकेची स्वायत्तता आणि राज्य शासनाचे अधिकार याचाही फैसला होणार आहे. प्रकरण न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत.
माजी महापौर सुनील कदम यांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याचा ठराव या निवडीच्या सभेत घेण्यात आला होता. तर, अन्य चार स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची शिफारस मान्य करण्यात आली होती. या ठरावावर महापौर अश्विनी रामाणे यांनी स्वाक्षरी केली होती. निवडीचा अहवाल आयुक्त नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला होता. शासनाने याबाबत महापालिकेस निर्णय घेण्यास कळवले होते. त्यानुसार आज झालेल्या महासभेत स्वीकृत सदस्य निवडीचे राजकारण आणखी रंगले. कदम यांचा महापालिकेतील प्रवेश सत्ताधाऱ्यांसाठी डोखेदुखी ठरणार असेच सभेतील चित्र होते.
माजी महापौर तृप्ती माळवी यांच्या लाचखोरीचा मुद्दा उपस्थित करीत प्रा. जयंत पाटील यांनी या प्रकरणी सुनील कदम यांनी लाचखोर माळवी यांची बाजू घेत महापालिकेविरुद्ध दावा दाखल केल्याचा दाखला दिला. या दोन्ही बाबी महापालिकेची अप्रतिष्ठा करणाऱ्या असल्याने कदम हे स्वीकृत नगरसेवक होऊ शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी न्यायालयाने महासभेने निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे. गरज पडली तर महापालिकेने उच्च न्यायालयात त्रयस्थ पक्ष म्हणून जाण्याची तयारी ठेवण्याची सूचना त्यांनी केली, तर सूरमंजिरी लाटकर यांनी महासभेने मंजूर केलेला ठराव विखंडित करण्याचा शासनाचा आदेश महापालिकेच्या स्वायत्तता तत्त्वाला धक्का देणारा असल्याची टीका केली.
भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी लाचखोर महापौर तृप्ती माळवी या सत्ताधाऱ्यांच्या शब्दप्रयोगास आक्षेप घेतला. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले आहे. सुनील कदम यांना यामध्ये नाहक गोवले जात असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
शिवसेना गटनेता नियाझ खान यांनी सत्तारूढ आणि विरोधक स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करण्याच्या विषयावरून निव्वळ राजकारण करीत असल्याचा आरोप केला. २ तास याच विषयावर चर्चा सुरू असल्याने नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडण्यास वेळ मिळणार कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधी गटाचे सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी सत्तारूढ आणि विरोधक असे दोघांचे ठराव मतदानास घावे अशी मागणी केली. मतदानात सत्ताधाऱ्यांची सरशी झाली.
सव्वा एकरावर अतिक्रमण
सभेत विलास वास्कर यांनी खरे मंगल कार्यालय परिसरात तब्बल सव्वा एकर परिसरात अतिक्रमण झाल्याचा खळबळजनक आरोप केला. येथे ३-४ माजली इमारती, घरे, दुकान गाळे बांधल्याची छायाचित्रे त्यांनी सभेत सदर केली. महापालिका प्रशासन या बाबतीत थंड कसे, असा सवाल त्यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांना केला. त्यावरून त्यांची व आयुक्तांच्यात हमरातुमरी झाली. संतप्त वास्कर यांना अन्य नगरसेवकांनी शांत केल्यावर या विषयावर पडदा पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा