कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन अद्यावत तंत्राद्वारे तात्काळ करण्यात यावे. ते मूळ स्वरूपात डोक्यावरील नाग प्रतिमेसह झाले पाहिजे, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक, देवस्थान समितीचे सचिव प्रांताधिकारी करवीर यांच्याकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हंटले आहे की, अंबाबाई देवीचे मूर्तीची झीज रोखण्यासाठी सन २०१५ व सन २०२१ मध्ये मूर्तीचे संवर्धन करण्यात आले होते. यावेळी अनेक अनुचित बाबी निदर्शनास आल्या . काही बाबी आणि चुका मागील वेळी संवर्धन करताना झाल्याचे नुकत्याच सादर झालेल्या अहवालावरून दिसून येते.
हेही वाचा…कोट्यवधीचा गंडा; इंडिया मेकर्स ऍग्रो इंडियाशी संबंधित आणखी दोघांना कोल्हापुरात अटक
मागील वेळी संवर्धनासाठी वापरलेले पदार्थ हे मूळ मूर्तीच्या पाषाणाशी न जुळल्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेल्याचे व झीज झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. व्ही आर मांगीराज, त्रंबके यांनी जानेवारीत दिलेल्या अहवालात या बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत.
संवर्धन केवळ दोन दिवसात कसे?
यानंतर आता अंबाबाई देवीचे मूर्ती संवर्धन करण्याचा निर्णय प्रशासनाने घोषित केला आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई देवीचे मूर्तीचे संवर्धन केवळ दोन दिवसात कसे होणार ही आश्चर्यकारक बाब आहे. ही संवर्धन प्रक्रिया इतकी साधी, सोपी असती असेल तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ते राबवण्याबाबत इतका विलंब का केला हा प्रश्नच आहे.
हेही वाचा…एकीकडे उमेदवारी अर्जाची तयारी दुसरीकडे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड; राजू शेट्टी पेचात
…तर अधिकारी जबाबदार
तरीही अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन हे तात्काळ झालेच पाहिजे आणि ते मूळ स्वरूपात डोक्यावरील नाग प्रतिमेसह झाले पाहिजे अशी भक्तांची इच्छा आहे. पदाचा दुरुपयोग करून काही गडबडीत आणि अयोग्य पद्धतीने संवर्धनाचे काम पुन्हा होऊ नये . तसे घडल्याचे यथावकाश समोर आले तर त्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावले असल्याचे समजून संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असे दिले देसाई यांनी या निवेदनात नमूद केले आहे.