प्रेमिकांचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्हॅलेंटाईन डे’साठी पंचगंगा काठी फुललेल्या गुलाबांनी युरोपसह जगभराची बाजारपेठ व्यापली आहे. या एका तालुक्यातून ५० लाख गुलाबांची निर्यात करण्यात आली असून यातील ४२ लाख फुले केवळ युरोपात पाठविली गेली आहेत.
शिरोळ तालुक्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांत ‘ऊस एके ऊस’ या मानसिकतेतून बाहेर पडून हरितगृहाच्या शेतीकडे वळले आहेत. यातूनच इथे हरितगृहातील फुलशेती उदयास आली आहे. अनेक शेतकरी छोटय़ा प्रमाणात किंवा मोठय़ा उद्योजकांच्या जोडीने हा कृषी व्यवसाय करत आहेत. ‘श्रीवर्धन बायोटेक’ आणि ‘घोडावत अॅग्रो’ ही यातली दोन मोठी नावे आहेत. आमदार सा. रे. पाटील यांनी स्थापन केलेल्या ‘श्रीवर्धन बायोटेक’तर्फे १०३ एकरांवर सध्या हरितगृहातील फुलशेती केली जात आहे. ‘घोडावत अॅग्रो’ तर्फेही १५० एकरांवर ही फुलशेती बहरली आहे. या दोन्ही ठिकाणी गुलाबासह जरबेरा, गुलाब, कान्रेशन, लिलियम, शेवंती, जीप्सोफिला, ऑíकड आदी फुलांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.
‘व्हॅलेंटाईन डे’ ही फुलशेतीच्या बाजाराची दिवाळी असते. या उत्सवाच्या निमित्ताने जगभरातून शिरोळमधील गुलाबांना मागणी येते. ‘श्रीवर्धन’चे चालक गणपतराव पाटील, त्यांचे जावई रमेश पाटील यांच्याकडे नववर्ष उजाडले की विदेशातून गुलाबाच्या मागणीच्या नोंदणीला सुरुवात होते. यंदा खास ‘व्हॅलेंटाईन डे’साठी ‘श्रीवर्धन’मध्ये १८ लाख गुलाबाच्या फुलांचे उत्पादन घेतले आहे. यातील १२ लाख फुले एकटय़ा युरोपात रवाना झाली आहेत. उर्वरित फुले जपान, ऑस्ट्रेलिया आदी देशात तसेच भारतातील अन्य मोठय़ा शहरांमध्ये निर्यात झाली आहेत.
उद्योगपती संजय घोडावत, नीता घोडावत व श्रेणिक घोडावत यांच्या नियोजनाखाली नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘घोडावत अॅग्रो’नेही यंदा ३० लाख निर्यातक्षम गुलाबाच्या फुलांचे उत्पादन केले आहे. ही सर्व फुले युरोपातील विविध बाजारपेठांमध्ये पाठविली आहेत. यामध्ये ब्रिटन, फ्रान्स देशातील निर्यात मोठय़ा प्रमाणात आहे. याशिवाय काही फुले देशांतर्गत बाजारपेठांमध्येही पाठवली असल्याची माहिती या उद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कोटेचा यांनी दिली. या दोन मुख्य उत्पादकांबरोबर तालुक्यातील अन्य छोटय़ा -मोठय़ा उत्पादकांकडील मिळून तब्बल ५० लाख गुलाबांची शिरोळमधून ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी निर्यात झाली आहे.
लाल गुलाबास सर्वाधिक मागणी
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने सर्वत्र लाल गुलाबास सर्वात जास्त मागणी आहे. यामुळे त्या रंगांच्या गुलाबाचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. या खालोखाल गुलाबी, पांढरा , पिवळा , मरून (मातकट लाल) रंगाच्या गुलाबांनाही मागणी आहे.