लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांना वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केली. या निर्णयाचे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी स्वागत केले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली असताना आज त्यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

आणखी वाचा-शाहू महाराज – उद्धव ठाकरे भेटीवेळी संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा, राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे नाराज

दरम्यान, शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल, असे पाटील यांनी ट्विट करून म्हटले आहे.

लढाईला बळ देणारा पाठिंबा

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पिढ्यान् पिढ्यांचे ऋणानुबंध आणि वैचारिक वारसा जपत छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला त्याबद्दल आभार! ही एकजूट निश्चितपणे लढाईला बळ देणारी आहे, अशी प्रतिक्रिया शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vanchit bahujan aaghadi support for shahu maharaj in kolhapur mrj