हॉटेलमध्ये फुकट जेवण वेळेत न दिल्याच्या रागातून चौघांनी बुधवारी हॉटेल मालकाला धमकावत हॉटेलची तोडफोड केली. याबाबतची तक्रार हॉटेल मालक धनाजी मारुती जाधव यांनी दिली. याबाबत अधिक माहिती अशी की, धनाजी जाधव यांचे मिरजकर तिकटी येथे कृष्णा हॉटेल आहे. सुंदर शेट्टी व त्यांचे बंधू सतीश शेट्टी यांनी हे हॉटेल चालविण्यासाठी घेतले आहे. बुधवारी दुपारी हॉटेलच्या मागील पिछाडीस रोहन चव्हाण, बाबू, प्रवीण, विकी हे चौघे मद्यप्राशन व नशा करत बसले होते. रोहनने हॉटेलमधील वेटरकडे जेवणाची मागणी केली. वेटरने त्यांना पुलाव नेऊन दिला. पुन्हा दोन वेळा या चौघांनी वेटरकडे जेवणाची मागणी केली. मात्र वेटरने जेवण देण्यास नकार दिला. यामुळे मद्यधुंद अवस्थेत रोहन, बाबू, प्रवीण, विकी यांनी हॉटेल चालक सुंदर शेट्टी यांच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. आम्हाला जेवण देत नाहीस, तू हॉटेल कसे चालवतोस बघतोच असे म्हणून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी हॉटेलमधील काचा, बरण्या फोडण्यास सुरुवात केली.
लाच घेताना तलाठय़ास अटक
सांगली- खरेदी दस्ताची फेरफारला नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेत असताना गुरुवारी लाचखोर तलाठी जाळ्यात अडकला. वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील गावकामगार तलाठी अनिल चव्हाण याला लाच घेतल्याबद्दल रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराने जमीन खरेदी केली आहे. या खरेदी दस्तानुसार खरेदी दस्ताच्या आधारे फेरफार रजिस्टरला नोंद करून खरेदीदाराच्या नावे सातबारा उतारा देण्यासाठी वाटेगाव येथील गावकामगार तलाठी चव्हाण यांने तक्रारदाराकडे अडीच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. बुधवारी लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा टाकून लाचखोर तलाठी चव्हाण याला अटक केली.