कोल्हापूर : कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या राधानगरी- दाजीपूर रस्त्यावरील वाहतूक तब्बल महिन्याभरानंतर दिवसाच्या प्रवासासाठी सुरू करण्यास शुक्रवारी परवानगी देण्यात आली आहे. या मार्गावरील रस्ते दुरुस्तीसाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या राधानगरी- दाजीपूर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या ५ मार्चपासून बंद करण्यात आला होता. जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार वाहतूकदारांना अन्य रस्त्यांचा वापर करण्यास सुचवले होते. हा मार्ग बंद झाल्यामुळे कोल्हापूर आणि कोकणात ये जा करणाऱ्या वाहतुकीला मोठा फटका बसला होता. त्यांना अन्य मार्गाचा वापर करावा लागत होता. तसेच या परिसरातील न्यू करंजे, राऊतवाडी, मांडरेवाडी, शेळप, बांबर, सतिचामाळ व हसणे गावातील ग्रामस्थांच्याही दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी, नोकरदार व स्थानिक नागरिकांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. परीक्षांचा काळ असल्यामुळे हा रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी होत होती.
या सर्व मागण्यांचा विचार करत हा रस्ता काही अटींवर दिवसाच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामध्ये रस्त्याचे पूर्ण काम होईपर्यंत अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बस, रुग्णवाहिका, स्थानिक ग्रामस्थ यांच्या वाहतुकीच्या नियमांच्या अधीन राहून फक्त दिवसा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.