कोल्हापूर : ज्येष्ठ नाटय़ वितरक प्रफुल्ल गणपतराव महाजन यांचा मृतदेह सोमवारी शहरातील एका तलावात आढळला. ७० वर्षीय महाजन रविवारपासून घरातून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरु होता.
कोल्हापुरातील नाटय़ चळवळीशी महाजन गेली चार दशके निगडित होते. ते अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कोल्हापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांचे अशापद्धतीने निधन झाल्याने नाटय़प्रेमींना धक्का बसला. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असत. शाहूपुरीतील तिसऱ्या गल्लीत ते राहात होते.
ते बेपत्ता असल्याची फिर्याद कु टुंबीयांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात काल दिली होती. समाज माध्यमातही ते हरवले असल्याचे नमूद करून शोधासाठी आवाहन करण्यात आले होते. त्यांची पादत्राणे कोटीतीर्थ तलावाच्या काठावर सापडले होती. अग्निशामक दल व आपत्कालीन यंत्रणेच्या सहायाने काल दिवसभर तेथे शोध घेतला.
आज तलावाच्या परिसरात स्थानिक तरुणांना मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनी याची माहिती मुलगा गिरीश महाजन यांना दिली असता अंगावरील कपडय़ांवरून मृतदेहाची खात्री करण्यात आली.