कोल्हापूर : पुसेसावळी येथील दंगलीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र पावसकर हे  उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत, असा आरोप ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन संघटनेने (एमआयएम) सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कर्तव्यात कसूर केली असल्याने दंगल उसळली. त्यामुळे त्यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन्ही मागण्यांचे निवेदन एमआयएम संघटनेने कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना आज दिले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एमआयएमचे राज्य कार्याध्यक्ष अब्दुल गफर कादरी म्हणाले, पुसेसावळी मध्ये १८ ऑगस्ट रोजी एका युवकांनी समाज माध्यमात आक्षेपार्य पोस्ट अग्रेषित केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दुसऱ्याच्या दिवशी विक्रम पावसकर यांनी मोर्चा काढला तेव्हा वादग्रस्त घोषणा देण्यात आल्या होत्या. या मोर्चाला परवानगी नव्हती. मोर्चा वेळी पावसकर यांनी चिथावणीखोर भाषण केले. पण पावसकर हे फडणवीस यांचे निकटवर्ती असल्याने पोलीस कारवाई करत नाहीत असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >>> ‘गोकुळ’ मोडण्यासाठी ‘अमूल’चे आक्रमक कारस्थान; मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप

पुसेसावळी दंगली प्रकरणी २२ऑगस्ट व ८ सप्टेंबर रोजी दोन वेळा संबंधित यंत्रणाकडे निवेदन देण्यात आले. याबाबत कोणतीच कारवाई झाली नाही. उलट दुसऱ्या दिवशी मोठ्या जमावाने प्रार्थनास्थळात येऊन नासधूस केली. त्यात एकाचा मृत्यू  आणि १५ लोक जखमी झाले. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीस यंत्रणा भाजपच्या दबाबाखाली काम करत आहे. याबाबत उपरोक्त मागण्या पोलीस महानिरीक्षकांकडे केलेल्या असून त्याबाबत उचित कार्यवाही झाली नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष इम्रान सनदी, धर्मराज साळवे, अखिल मुजावर, दीपक कांबळे, भैया शेख, विकास एडके आदी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram pavaskar the mastermind of the pusesavali riots he is close to devendra fadnavis ysh