डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय पथकाने अटक केलेला डॉ. वीरेंद्र तावडे हा कोल्हापुरात १३ जणांच्या वारंवार संपर्कात असल्याचे शनिवारी पोलीस तपासात समोर आले आहे. या तेरा जणांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच त्यांचे लोकेशन याची पोलीस माहिती गोळा करत असून त्यांच्यावर  लक्ष ठेवण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२००१ ते २००८ या कालावधीत तावडे कोल्हापुरात असल्याचे तपासात उघड झाले होते. या कालावधीमध्ये तावडे सनातन संस्थेशी संबंधित असणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अग्रभागी होता. डॉ. दाभोलकर यांची सभाही तावडे याने उधळल्याचे तपासात समोर आले होते. २००८ नंतर सातारा व यानंतर पनवेल येथे असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली होती.

मात्र दाभोलकर हत्येपूर्वी दोन वष्रे तावडे कोल्हापुरात वारंवार येत होता. सारंग अकोलकरला बंदूक तयार करून देण्याची मागणी तावडेने एका साक्षीदाराकडे केली होती. याच दरम्यान तावडे आणखी १३ जणांच्या संपर्कात असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली आहे. त्या तेरा जणांची गोपनीय रीत्या माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. यापकी काही जणांची पोलिसांनी पानसरे हत्या प्रकरणात चौकशी देखील केली आहे.

तेरा जणांची यादी तयार

तावडेच्या संपर्कात असलेल्या तेरा जणांची यादी पोलिसांनी केली असून त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. तावडे सोबत त्यांचे काय कनेक्शन आहे. तावडेने त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली होती काय, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच त्यांचे मागील काही वर्षांचे कॉल डिटेल्सही तपासण्याचे काम सुरू आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणात तावडेने आपल्याकडून बंदूक तयार करून मागितल्याची साक्ष कोल्हापुरातील एकाने सीबीआय पथकाला दिली होती. यानंतर सनातन संस्थेने त्या साक्षीदाराचे नाव उघड केल्याने शनिवारपासून त्या साक्षीदारास पोलीस संरक्षण देण्यात आले.

 

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virendra tawde contact with 13 people in kolhapur
Show comments