लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीनंतर तब्बल पाच महिन्यांनंतर किल्ले विशाळगड पर्यटक, दुर्गप्रेमींसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या असून, यामध्ये गडावर यापुढे मांसाहार करण्यास तसेच संध्याकाळी पाचनंतर थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे.

गतवर्षी जुलै महिन्यात विशाळगड अतिक्रमण प्रकरणी दंगल उसळली होती. त्यानंतर प्रशासनाने पर्यटक, तसेच अन्य लोकांसाठी गडावरील प्रवेश बंद केला होता. या घटनेनंतर तब्बल ५ महिन्यांनंतर प्रशासनाने विविध अटींचे पालन करत ३१ जानेवारीअखेर हा गड पर्यटक, तेथील दर्गा, तसेच तेथील मंदिरात असलेल्या देवतांच्या दर्शनासाठी आज खुला केला आहे.

आणखी वाचा-गाळप हंगाम विलंबाचा साखर उद्योगाला फटका, साखर उत्पादनात ९२ लाख क्विंटलची घट

मांसाहारास मज्जाव

पोलीस प्रशासनाकडून आलेल्या व्यक्तींची पडताळणी करूनच गडावर जाण्यास अनुमती दिली जाणार आहे. सायंकाळी ५ नंतर कोणासही गडावर थांबता येणार नाही, उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे गडावर मांसाहारी पदार्थ घेऊन जाणे अथवा तिथे खाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाच्या अनुमतीशिवाय कोणत्याही संघटनेस धार्मिक अथवा अन्य कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. शाहूवाडी तहसीलदारांनी याबाबत आदेश काढला असून, त्यामध्ये वरील अटींचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

Story img Loader