दयानंद लिपारे
कोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेने या हंगामात कापसाचे भाव कमी झाले असले तरी वस्त्रोद्योगातील अर्थकारणाला अद्यापही गती आलेली नाही. कापूस दरात चढ-उतार होत असल्याने सूत, कापड विक्रीवर परिणाम होत आहे. अस्थिरतेचे सावट अजूनही वस्त्रोद्योगातून दूर होत नसल्याने चिंतेचे जाळे दाटले आहे.
या वर्षी वस्त्रोद्योगात दिवाळीच्या वेळी आशेचे किरण उजळले होते. गेल्या हंगामात कापूस दराने विक्रमी दरवाढ पाहिली होती. ६० हजार रुपये प्रतिखंडी असणारा कापूस दर लाखाच्या वर गेला होता. याचा परिणाम वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीवर होऊन एकूणच उद्योग कमालीचा अडचणीत आला होता. या हंगामात कापसाचे पीक चांगले असल्याने आशा बळावल्या आहेत. पण सुरुवात काही उमेद वाढवणारी नव्हती. दिवाळी पाडव्या वेळी कापडाचे सौदे निराशाजनक राहिले. काही प्रकारच्या कापडांना अजिबात मागणी नसल्याने यंत्रमागधारकांना हा आश्चर्याचा धक्का होता. दिवाळी उलटून पंधरवडा लोटला तरी वस्त्रोद्योगाचे चक्र अद्यापही गतिमान होताना दिसत नाही. यामागे वस्त्रोद्योगाचा मूलाधार असलेल्या कापूस दरातील अस्थिरता हे कारण आहे.
दर कमी
गेल्या हंगामात कापूस दराने नवनवे विक्रम प्रस्थापित केले होते. दिवाळी संपल्यानंतर कापूस दर गेल्या हंगामाच्या सुरुवातीला होता; त्याप्रमाणे प्रतिखंडी ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. तथापि भविष्यातील मागणीचे अनिश्चित चित्र आणि युरोप, अमेरिकेतील मंदी ही भीतीची छाया वस्त्रोद्योगाला सतावत आहे. यामुळे कापूस दर कमी झाले असले तरी त्यातही चढ-उतार सतत होत आहेत. विशिष्ट दराने कापूस खरेदी केला की तो पोहोचेपर्यंत त्यामध्ये चढ किंवा उतार तीव्रतेने झालेला असतो. परिणामी सूतगिरणी चालकांना सूत नेमक्या कोणत्या दराने विकायचे याचा संभ्रम निर्माण झालेला आहे. सूत उत्पादन थांबवणेही शक्य नसते. विजेच्या लोड फॅक्टरचा लाभ घेऊन मासिक ८-१० लाख रुपयांची सवलत मिळवण्यासाठी काही वेळा सूत कमी दराने विकावे लागते. त्यातून बाजारात सूत दर कमी झाल्याची अफवा पसरून बाजार असंतुलित होण्याचा धोका असतो. परिणामी ही अस्थिरता सूतगिरणीचालकांना त्रस्त करीत आहे.
सावध पवित्रा
कापूस दर कमी-अधिक होण्याचा परिणाम सूतगिरणी व्यवसायावर होत आहे. तसाच तो वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीवरही होऊ लागला आहे. कापूस दर अस्थिर असल्याने त्याकडे नजर ठेवून यंत्रमागधारक मोजक्या प्रमाणात सूत खरेदी करीत आहे. तर दुसरीकडे यंत्रमागधारकांना कापडाचा दर नेमका किती मिळणार याचा अंदाज नसल्याने विक्री करतानाही सावध व्हावे लागत आहे. कापड व्यापाऱ्यांना देशभरातील मंडईमध्ये कापडाला मिळणाऱ्या दराबद्दलची शाश्वती मिळत नसल्याने तेही हात राखूनच खरेदी करत आहेत. एकूणच वस्त्रोद्योगात हातातोंडाची गाठ घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नव्या हंगामाच्या सुरुवातीला दिसत आहे.
नवा हंगाम सुरू होताना वस्त्रोद्योग नेमक्या कोणत्या गतीने पुढे जाणार याचा अंदाज येत नाही. सूतगिरणी चालक, यंत्रमागधारक, कापड अडते, कापड व्यापारी या सर्वामध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. यामुळे वस्त्रोद्योगाची साखळी स्थिर होताना दिसत नाही. ती अस्थिर असल्याने व्यवसायाचे धोरण कसे ठेवायचे याची निश्चिती दिसत नाही. वस्त्रोद्योगात स्थिरता येण्यासाठी कापूस दर नियंत्रित असले पाहिजे. यासाठी कापूस कमोडिटी मार्केटला जोडला आहे; तो दूर करण्याची गरज आहे.
– किरण तारळेकर, अध्यक्ष विराज स्पिनर्स, अध्यक्ष विटा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संघ