संस्था अर्धी रक्कम भरणार, सभासदांना सुवर्णमहोत्सवानिमित्त भेट
कोल्हापूर : वारणा दूध संघाच्या सभासदांना दुधात साखर पडल्याचा गोड अनुभव संस्थेकडून आला. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त पाच हजाराचा शेअर्स संस्था खर्चाने दहा हजाराचा करण्याची घोषणा संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे यांनी बुधवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली.
वारणानगर येथील वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. सभेत सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. या सभेत संघाच्या ५० वर्षांच्या कामगिरीचे सिंहावलोकन करत कोरे यांनी भावी नियोजनाची दिशा स्पष्ट केली. ते म्हणाले, ७८३ कोटींची उलाढाल असलेल्या संघास या वर्षी ढोबळ नफा ८३ कोटीचा सर्वाधिक नफा झाला आहे. देशपातळीवरील पतमूल्यांकनात ‘अ उणे’ मानांकन मिळवणारा एकमेव दूध संघ ठरला आहे. सुवर्णमहोत्सवी वाटचालीनिमित्त सभासदांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या पाच हजाराच्या शेअर्समध्ये संघ आपल्या नफ्यातून पाच हजाराचा निधी घालून तो शेअर्स दहा हजाराचा करणार आहे. त्याचबरोबरच संस्था सभासदांचाही १० हजाराच्या शेअर्समध्ये संघ स्वत:चे ४० हजार घालून तो शेअर्स ५० हजाराचा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. तसेच १ लाख १० हजार दूध उत्पादक सभासदांना संघामार्फत विम्याचे हप्ते भरत विमासंरक्षण देऊन वेगळाच ऋणानुबंध संघाने जपला आहे.
जनावरांच्या कानात इ टँग बसवून सर्वेक्षण करण्यात येईल. वारणाचे माल्टेड फूड प्रॉडक्ट बाजारात आणणार आहे. दूध निर्यातीसाठी १० लाख लीटरची दुबईची मागणी नोंद झाली आहे. दिवसाला २० ते २५ टन दही उत्पादन करण्यात येणार असून, दिवसाला अडीच टन ताजे पनीर बाजारात आणून वारणेचा दबदबा निर्माण केला जाणार आहे. या वेळी वारणा बासुंदी या नवीन दुग्धपदार्थाचा विRी प्रारंभ करण्यात आला.
श्रद्धांजलीचा ठराव संघाचे उपाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांनी मांडला. स्वागत संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले. नोटीस वाचन संघाचे सचिव के. एम. वाले यांनी केले. आभार ज्येष्ठ संचालक एच. आर. जाधव यांनी मानले. सभेचे सूत्रसंचालन शीतल बसरे यांनी केले.
बाजारपेठेत दबदबा
अहवाल सालात दूध संकलनात १६ कोटी ४२ लाख लीटरची प्रचंड वाढ झाली असून, कार्यक्षेत्रातही १ कोटी २० लाख दूध संकलन वाढले आहे. त्याचा लीटरमागे ८९ पैशाप्रमाणे ४० लाखाचा दूध उत्पादकांना फायदा झाला आहे.