कोल्हापूर : वारणा सहकारी दूध संघास दूधपुरवठा करणांऱ्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडील ५ लाख जनावरांसाठी आधुनिक प्रजनन धोरण राबविणार असल्याची घोषणा संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी केली. यासाठी १०० तज्ज्ञ कृतिम रेतकांची नेमणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगीतले. वारणा दूध संघाच्या पशुधन विकास योजनेचा शुभारंभ आमदार कोरे यांच्या हस्ते झाला.

यावेळी ते म्हणाले, पारंपरिक दूध व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी ‘वारणा’ पशुधन विकास ही आधुनिक योजना २४४ गावांतील ९२६ संस्थेच्या माध्यमातून ६० हजार दूध उत्पादकांसाठी राबवली जाणार आहे. गोठ्यांमध्ये जातिवंत जनावरांच्या पैदाशीसाठी कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, उपचार व पैदास होणारे जनावर अशी सर्व माहिती वारणा ॲपवर उपलब्ध होणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना सेवा, योग्य वेळी मार्गदर्शन व सूचना मिळणार आहेत.

कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी प्रास्ताविक, वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. पाटील यांनी पशुधन विकास योजनेची माहिती, उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांनी आभार मानले.

भरीव पगारवाढ

वारणा दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार दरमहा ३२०० ते ४५०० रुपये इतकी भरीव वेतनवाढ करण्यात येत असल्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सांगितले. सुमारे २ हजार कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून ही वाढ मिळणार असून संस्थेला वार्षिक ८ कोटी खर्च करावे लागणार आहेत.