तहानलेल्या लातूरकरांसाठी मिरजेहून ५ लाख लिटर्सची जल एक्स्प्रेस सोमवारी संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्या दृष्टीने रेल्वेच्या विद्यमान यंत्रणेद्वारे रविवार दुपारपासून टँकरमध्ये पाणी भरण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. ही लातूरकरांसाठी चाचणी तत्त्वावर जलभेट असून १७ एप्रिलपासून २५ लाख लिटर्सची रेल्वे देण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
लातूरला रेल्वेने पाणी देण्यासाठी मिरज स्थानकांची निवड करण्यात आली असून यासाठी आवश्यक असलेली पाण्याचे ५० टँकर असलेली गाडी रविवारी सकाळी मिरज स्थानकाच्या मालधक्क्यावर पोहचली. जलशुद्धीकरण केंद्रापासून मालधक्क्यापर्यंतचे अंतर अडीच किलोमीटर असून या ठिकाणी टँकरसाठी स्टॅण्ड पोस्ट तयार करणे, जलवाहिनी टाकणे ८० आणि २० अश्वशक्तीचे पंप बसविणे, या पंपासाठी स्वतंत्र विद्युत जोडणी करणे आदी कामे करावी लागणार आहेत. ही कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून आवश्यक लोखंडी व पी.व्ही.सी. पाइप जागेवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
तथापि, खुदाईचे काम करीत असताना रेल्वे सिग्नलला धक्का न लागता काम करावे लागत असल्याने थोडय़ा कमी गतीने काम करावे लागत आहे. तरीसुद्धा चार दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंते जागेवर आहेत.
आज दुपारी तीन वाजल्यापासून फलाट क्रमांक दोन वर वाघिणीमध्ये रेल्वेच्या उपलब्ध यंत्रणेद्वारे पाणी भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी दहा वाघिणी फलाटवर पाणी भरण्यासाठी थांबविण्यात आल्या असून ७५ हजार लिटर्स क्षमतेच्या वाघिणीमध्ये ५० हजार लिटर्स पाणी भरण्यात येणार आहे. अशा १० वाघिणी भरून लातूरसाठी उद्या सकाळपर्यंत रवाना करण्याचे नियोजन असून चाचणी तत्त्वावर पहिली रेल्वे ५ लाख लिटर्स पाणी घेऊन सोमवारी रात्रीपर्यंत लातूरला पोहोचविण्यासाठी धांदल सुरू आहे.
या कल्पनेचे प्रवर्तक मकरंद देशपांडे यांच्यासह भाजपाचे काही कार्यकत्रे रेल्वे स्थानकावर दिवसभर ठाण मांडून होते. दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, प्रवक्ते महेश खराडे आदींनी रेल्वेमध्ये पाणी भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. सायंकाळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनीही पाहणी केली.