िशगणापूर बंधाऱ्यातून होणारा पाणीपुरवठा बंद
शहरात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या िशगणापूर बंधाऱ्यातील पाणी पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठा बंद झाला असून नागरिकांना बुधवारपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या शहराला एक दिवसा आड पाणी पुरवठा सुरु आहे. तोही सध्या बंद राहणार असून काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.टंचाईच्या काळात महापालिकेकडील उपलब्ध टँकरद्वारे पाणी वितरित करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.
राधानगरी व काळम्मावाडी धरणातून िशगणापूर,कोल्हापूर शहराजवळील बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. तेथून ते शहराला पुरविले जाते. राधानगरी धरणात केवळ ०.४० टीएमसी तर काळम्मावाडी धरणात ०.७५ टीएमसी इतकाच पाणी साठा शिल्लक असल्याने या दोनही धरणातील पाणी िशगणापूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचणे अशक्य झाले आहे. त्यामुळे िशगणापूर बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. िशगणापूर पाणी योजनेतून शहराला होणारा पाणी पुरवठा बंद करावा लागला आहे. त्याचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पाटबंधारे विभागाकडून तुळशी धरणातून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले असून तुळशी धरणातून सोडलेले पाणी पंचगंगा नदी पात्रातून िशगणापूर बंधाऱ्यापर्यंत येण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शहरातील पाणी टंचाई सुरुच राहणार आहे. िशगणापूर बंधाऱ्यावर पाणी उपलब्ध झाल्यानंतर पाणी पुरवठा सुरु होईल, पण नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.