साखर कारखान्याच्या दूषित सांडपाण्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी कारखान्याचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या अंगावर पाण्याने भरलेली घागर फेकल्याची घटना शनिवारी घडली. या घटनेनंतर मुश्रीफ समर्थक आणि आंदोलक एकमेकांसमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

कागल तालुक्यातील मासा बेलेवाडी येथे आमदार हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आहे. या खासगी कारखान्याचे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाते. कारखान्यातील दूषित सांडपाणी नदीत मिसळत असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्याचा परिसरातील ग्रामस्थांचा आक्षेप आहे.

शनिवारी मुश्रीफ बेलेवाडी येथे आले असता ग्रामस्थांनी त्यांना घेराव घालून सांडपाणी प्रदूषणाचा जाब विचारला. तर काही संतप्त ग्रामस्थांनी पाण्याने भरलेल्या घागरी त्यांच्या दिशेने फेकल्या. यातून मुश्रीफ समर्थक आणि आंदोलक समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मुश्रीफ यांनी साखर कारखान्यामुळे नदी प्रदूषण होत असल्याचा आरोप फेटाळला .कारखाना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व निकषाचे काटेकोरपणे पालन करत असल्याचा दावा त्यांनी केला.