महापौर-उपमहापौर निवडीमध्ये यश मिळवल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते तसेच नूतन पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून करवीरनगरीच्या विकासात मोलाची भर घालणार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याचे नमूद करीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेतील चांगल्या कामांना सहकार्य करतानाच चुकीची कामे रोखून धरण्याचा इशारा दिला. अशाच आशयाची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर शहराच्या सर्वागीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहणार असून टोल रद्द करण्यासाठी तीव्र आंदोलन करणार असल्याचे महापौर अश्विनी रामाणे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की कोल्हापूर शहराची हद्दवाढ, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरीव निधी मिळवणेसाठी, शहरात ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह उभे करणे, तसेच कोल्हापूर शहरातील टोल कायमपणे हद्दपार करणेसाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी आमचे नेते सतेज पाटील, हसन मुश्रीफ व विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
जनमत व बहुमत हे दोन्हीही काँग्रेसच्या बाजूने असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा उल्लेख करुन माजी मंत्री सतेज पाटील म्हणाले, पालकमंत्र्यांनी केलेली चमत्काराची भाषा कुठेच चालली नाही. हा विजय सामान्य कोल्हापूरकरांचा असून शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार आहे. काँग्रेस निश्चितच वचननाम्याची पूर्ती करेल. सभागृहातील सर्वच नगरसेवक नवीन असल्याने त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग भरवण्यासाठी आयुक्तांना भेटणार आहोत.
अपेक्षेप्रमाणे घडल्याचा आनंद व्यक्त करीत राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, निकालानंतर त्रिशंकू अवस्था झाली होती. अशा वेळी सर्व पदे देण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता. पण त्यातील विश्वासार्हतेबद्दल शंका असल्याने तो नाकारला आणि त्यातून आजच्या निवडी घडल्याचा अभिमान वाटतो. शहरवासीयांना दिलेले आश्वासन पाळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
भाजपाचा महापौर होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता. त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तरीही घोडेबाजार न करण्याची भूमिका घेत महापौर निवडीला आम्ही सामोरे गेलो, अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आत्तापर्यंत सर्वात मोठा ३३ सदस्यांचा प्रबळ विरोधी पक्ष सभागृहात आकाराला आला असून तो चांगल्या कामांना सहकार्य करण्याबरोबरच चुकीच्या कामांना विरोध करीत राहील.
महापौर निवडीत शिवसेनेने वेगळा गट स्थापन करून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक लक्ष देतील. तसेच शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून शिवसेनेचे नगरसेवक काम करतील.
महापौर व विरोधी पक्षनेतेपद
महापौर अश्विनी रामाणे या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून २१ वष्रे अकरा महिने वयाच्या आहेत. त्या राज्यातील सर्वात कमी वयाच्या महापौर बनल्या आहेत. भाजप, ताराराणी आघाडी व मनसे यांच्यात ३३ सदस्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून भाजपाचे संभाजी जाधव (मागील सभागृहातील शिवसेनेचे गटनेते) यांची निवड करण्याचे पत्र रामाणे यांना दिले आहे. तर शिवसेनेच्या चौघा सदस्यांनी महापौरांना दिलेल्या पत्रात शिवसेनेचे गटनेतेपदी नियाज खान यांची निवड केल्याचे म्हटले आहे.  

Story img Loader