कोल्हापूर-वैभववाडी या प्रलंबित रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्याने रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल कोल्हापूर जिल्हय़ात स्वागतार्ह प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर-पुणे हा रेल्वेमार्ग विद्युतीकरण होणार असल्याने प्रवाशांना कमी कालावधीत हा प्रवास पूर्ण करता येणार असल्याने त्याचाही आनंद व्यक्त केला जात आहे. पायाभूत सुविधांची कामे करण्यात अर्थसंकल्प सरस ठरला असल्याची प्रतिक्रिया धनंजय महाडिक व राजू शेट्टी या खासदारद्वयींनी व्यक्त केली आहे. तथापि कोणतीही नवीन गाडी सुरू न झाल्याने प्रवाशांतून निराशा व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी या प्रदीर्घ काळ प्रलंबित रेल्वेमार्गाची घोषणा केली. या मार्गाचा सव्‍‌र्हे झाला असून, या बाबतचा अहवालदेखील सादर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे २७५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्र कोकणशी जोडला जाणार असून, दळणवळण वेगवान होण्याबरोबरच व्यापारालाही चालना मिळणार आहे. अनेक वर्षांपासूनच्या मागणीला या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने त्याचे स्वागत होत आहे. प्रवाशांबरोबरच दळणवळण आणि मालवाहतुकीसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार असल्याचे सांगून खासदार महाडिक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री प्रभू व खासदार शरद पवार यांना धन्यवाद दिले आहेत. तर खासदार शेट्टी यांनी कोल्हापूर भागातील शेती, दुग्ध उत्पादन, फौंड्री, वस्त्रोद्योग याची निर्यात रत्नागिरी बंदरातून करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले. तसेच हा रेल्वेमार्ग पुढे लातूरला जोडून कोकण-मराठवाडा असा नवा मार्ग आकाराला येणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी ६१ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून कोल्हापूरकरांच्या महत्त्वाच्या दोन मागण्या मान्य झाल्या आहेत.
दरम्यान, मध्यवर्ती रेल्वे सल्लागार समितीचे यशवंत बियाणी यांनी कोल्हापुरातील रेल्वे ग्राहकांसाठी पायाभूत सुविधा मिळण्यास रेल्वे अर्थसंकल्पाने मदत झाल्याबद्दल त्याचे स्वागत केले. मात्र कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट रेल्वेसह कोणतीही नवीन रेल्वे सुरू न झाल्याबद्दल निराशा व्यक्त केली.