कोल्हापूर: व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या टोळीला आज कोल्हापूर पोलिसांनी पकडले. आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून त्यांच्याकडून तब्बल सुमारे ११ कोटी किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केले. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांची ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
कोल्हापुर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटीची तस्करी केली जात आहे. पोलिसांनी तीन चार वेळा सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त करून काही जणांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.आज असाच प्रकार समोर आला आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती. अंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावला होता. या मार्गावरून सदर संशयित आरोपी गाडी काळ्या रंगाचा टाटा सफारी गाडीतून आणि एका दुचाकी वरून जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता व्हेल माशाची उलटी अवैधरित्या वाहतूक करत असतानाचे मिळून आले.
या प्रकरणी संशयित आरोपी अकबर याकुब शेख (५१ ), शिवम किरण शिंदे (२३ ), गौरव गिरीधर केरवडेकर (३३ ), इरफान इसाक मणियार (३६) आणि फिरोज भावुदिन ख्वाजा ( ५३ रा. कुडाळ तालुका, जि.सिंधुदुर्ग) या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी १० कोटी ७४ लाख रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी जप्त केली. या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम इतके आहे.