कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर आणि अंबप या दोन ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करतानाच त्यांना सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. त्यांची लगोलग अंमलबजावणी झाल्याने सन्मानित झालेल्या विधवांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. भावनावश होत त्यांनी गावकऱ्यांसमोर हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. याचवेळी, महिलांबाबत केल्या जाणाऱ्या भेदभावाला मूठमाती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिरोळ तालुक्यातील तेरवाड या गावामध्ये विधवांच्या जुन्या परंपरा बंद करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. तेव्हा तेरवाड हे असा निर्णय घेणारे राज्यातील दुसरे गाव ठरले होते. त्याचा संदेश अन्य गावांमध्येही पोहोचत असून तेथेही अशा प्रकारचे निर्णय घेऊन उचित उपक्रम आयोजित केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलकापूरचे पुढचे पाऊल!

शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या गावात प्रजासत्ताक दिनी नरहर मंदिरात विधवा महिलांसाठी हळद-कुंकू समारंभाचे आयोजन करून देवाधिकाच्या साक्षीने पुढचे पाऊल टाकण्यात आले. प्रबोधनातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न गावातील राजाई महिला मंडळाने केला. यावेळी विधवांना हळदी-कुंकवाचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पती निधनानंतर वैधव्य वाट्याला आल्यानंतर प्रथापरंपरांच्या नावाखाली त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. सधवा – विधवा याच्यातील भेदाचे चटके त्यांना सहन करावे लागतात. त्यांच्या वाट्याला असे दुय्यम जीवन येऊ नये, त्यांनाही सधवाप्रमाणे सन्मान मिळावा या भावनेने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधवांना हळदी-कुंकवाचा मान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. मलकापूर येथील छायाचित्र

दुजाभावाचा कटू अनुभव

वैधव्याचे जिणं वाट्याला आलेल्या एका महिलेने ‘ गेली १४ वर्षांपासून सधवा – विधवा यांच्यातील दुजाभावाचा कटू अनुभव घेत आहे. कमी वयात वैधव्य वाट्याला आल्याने धार्मिक – सांस्कृतिक उपक्रमात सहभागी करून घेतले जात नव्हते. अशाही महिलांना सन्मान देता येतो हे दाखवून दिल्याने भावनिक आधार मिळाला आहे,’ अशा भावना व्यक्त करताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अनुराधा हिरवे, चंद्रप्रभा पाडळकर, स्मिता वरणे, प्रिया तांदळे आदींनी याचे आयोजन केले होते. शैक्षणिक व्यासपीठाचे विनायक हिरवे, संतोष कुंभार, संभाजी लोहार, दयानंद पाटील उपस्थित होते.

अंबपची पुरोगामी वाटचाल

हातकणंगले तालुक्यातील अंबप या गावी अनिष्ट विधवा प्रथेला तिलांजली देण्याचा निर्णय प्रजासत्ताक दिनी ग्रामसभेत घेण्यात आला. उपस्थित महिलांनी हात उंचावू विधवा प्रथा बंद करण्याच्या ठरावास अनुमोदन दिले. त्यांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले. कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीला साजेसा ऐतिहासिक निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे, असे मत सरपंच दीप्ती माने यांनी व्यक्त केले. लगोलग विधवांना हळदी-कुंकू लावून या निर्णयाची अंमलबजावणीही करण्यात आली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Widow practice stopped in two villages of kolhapur ssb