कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील उमेदवारीचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. शिवसेनेने माजी खासदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्याकडे मशाल सोपवल्यानंतर मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तर महाविकास आघाडीच्या संघटित ताकदीच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू, असा विश्वास उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेनेचा पाठिंबा राजू शेट्टी यांनी नाकारल्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या उमेदवारीचे शाहुवाडी पन्हाळा या विधानसभा मतदारसंघासह लोकसभा मतदारसंघात सर्वत्र स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
हेही वाचा – राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
बहुरंगी लढत; तरी विजय माझाच
उमेदवारी मिळाल्यानंतर सत्यजित पाटील सरूडकर म्हणाले, उमेदवारीच्या स्पर्धेत कोण होते यापेक्षा पक्षाने उमेदवारी दिली याचा आनंद आहे. स्पर्धा चौरंगी – बहुरंगी कशीही झाली तरी महाविकास आघाडी, शिवसैनिक आणि मतदारांच्या ताकदीच्या जोरावर निवडून येणे सहज शक्य आहे. प्रचाराची रणनीती लवकरच निश्चित करून सामूहिक प्रचार सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.