कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्यावरील टपाल तिकीट, कॉफी टेबल बुकचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे. नाटकही रंगमंचावर येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली.
महाराणी ताराराणी यांच्यावरील चित्ररथाचे उद्घाटन येथील नर्सरी बागेत करण्यात आले. त्यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे मंत्री शेलार बोलत होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने हा चित्ररथ तयार करण्यात आला असून, तो ८ दिवस कोल्हापूर जिल्ह्यात फिरणार आहे.
हेही वाचा >>> कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार – राजेश क्षीरसागर
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या ताराराणी यांचा इतिहास जनतेसमोर जाण्यासाठी हा चित्ररथ राज्यभर फिरवावा. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ताराराणी यांचे चरित्रही राज्यभर गेले पाहिजे, अशी सूचना केली.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, अतिशय खडतर काळ असताना ज्या पद्धतीने छत्रपती ताराराणी यांनी धैर्य दाखवले आणि दिल्लीच्या औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत गाडला. या इतिहासापासून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मंत्री आशिष शेलार आणि मी ताराराणींचा इतिहास नव्या पिढीसमोर येण्यासाठी चित्ररथ आणि अन्य आवश्यक बाबी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चांगल्या कार्यक्रमाचा फज्जा
दोन प्रमुख मंत्री, दोन खासदार, इतिहास संशोधक अशा मान्यवरांची उपस्थिती असतानाही ढिसाळ नियोजनामुळे या चांगल्या कार्यक्रमाचा फज्जा उडाला.