कार्यकर्त्यांच्या जीवावर सलग दोनवेळा खासदारकी गाजवणारे राजू शेट्टी यांनी एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडखोर हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजी माने यांनी रविवारी दिला.
त्यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाचा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राजीनामा बिल्ल्यास देत असल्याची घोषणाही पेठवडगाव येथे आयोजित स्वाभिमानी बंडखोर कार्यकर्ता मेळाव्यात केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करणाऱ्या शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्या कामकाज पद्धतीवर आसूड ओढत हाती बंडाचा झेंडा घेतला आहे. रविवारी झालेल्या या बंडखोर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी शेट्टींना पराभूत करू, अशी डरकाळी फोडली. या बंडखोर मेळाव्याचे अध्यक्ष पांडुरंग पाटील (टोप) होते.
बंडखोर माने यांनी स्वाभिमानीचा ‘बॉस’ सध्या एक ठेकेदार असल्याचा आरोप केला. वारणा साखर कारखान्याविरुद्ध ऊसदराची लढाई आम्ही केली. पुढील काळात एफआरपीचे आंदोलन हाती घेतले जाईल.
प्रास्ताविक गोरक्ष पाटील (डोणोली) म्हणाले, खासदारांनी शाहूवाडी तालुक्यात दोन वेळा भात परिषद घेतली. परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास घेतले नाही, असा आरोप केला. छत्रपती राजाराम साखर कारखाना संचालक बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर शेट्टी यांनी पोळी भाजली. मात्र कार्यकर्त्यांना सन्मान दिला नाही, अशी टीका केली.
निवास पाटील (शिगाव), दिलीप माणगावे (शिरोळ), प्रकाश पाटील (रांगोळी), दत्तात्रय शिंदे (जयसिंगपूर), भीमराव पाटील सरुडकर, शामराव पाटील (वाघवे) यांची भाषणे झाली. बंडखोर कार्यकर्त्यांची सुकाणू समिती करण्यात आली असून त्यात शिवाजी माने, धनाजी पाटील, शिवाजी पाटील, निवास पाटील, मोहन पाटील यांचा समावेश आहे.
भाजपा पुरस्कुत मेळावा?
या मेळाव्याच्या व्यासपिठावर भाजपा तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील आले. त्यामुळे बंडखोरांचा मेळावा आहे की भाजप पुरस्कुत? असल्याची मेळावास्थळी कुजबुज चालू होती. बंडखोर भाजपाच्या बाजूने जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
बावड्याची रसद
बंडखोरांना कसबा बावडा येथील एका प्रमुख सहकारी संस्थेतून रसद पुरवण्यात आली. गेल्या आठवड्यात या संस्थेतच बंडखोरीचे डावपेच रचले गेले. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यामागे ‘महा’शक्ती असल्याचे सांगितले जात आहे.