कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंगळवारी पावसाची उघडझाप सुरू होती. गेल्या दोन दिवसांत पावसाचे प्रमाण घटले असले तरी जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना असलेला पुराचा विळखा अद्याप कायम आहे. जिल्हा प्रशासनाने मंगळवारी पुढील चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने पुराची तीव्रता वाढणार का, याची चर्चा आहे.गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. आज दुपारपर्यंत पावसाने दडी मारली होती. दुपारनंतर शहरी भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर ढगाळ वातावरण होते. पाणलोट क्षेत्रात मात्र अधूनमधून दिवसभरात पावसाच्या सरी येत होत्या.
पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, ताम्रपर्णी या नद्यांचा पूर कायम आहे. तो ओसरण्याचे प्रमाण कमी आहे. पंचगंगा नदीमध्ये ४४ फूट ४ इंच पातळी असून ती धोका पातळीपेक्षा सव्वा फूट अधिक आहे. काल ती ४५ फूट ८ इंच होती. यावरून पाणी किती संथपणे कमी होत आहे याचा अंदाज येतो.शहरातील पुराचे पाणी काही प्रमाणामध्ये कमी होत चालले आहे. स्थलांतरित नागरिक घरी परतू लागले आहेत. ग्रामीण भागात पुराची तीव्रता अजून जाणवत आहे. घरे, शेती पाण्याखाली गेल्याची चिंता आहे. पुढील चार दिवसांमध्ये जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
© The Indian Express (P) Ltd