कोल्हापूर : कोल्हापूरातील दिन ऐतिहासिक वास्तूंना जोडणारी संरक्षक भिंत मंगळवारी सायंकाळी कोसळली. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी जखमी झाली आहे. काही वाहनांची नासधूस झाली आहे. खासबाग मैदान त्यालगत असलेले केशवराव भोसले नाट्यगृह या दोन्ही वारसाहक्क स्थळातील महत्वपूर्ण वास्तू आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह स्वच्छतागृहाला लागून असलेली खासबाग मैदानाची संरक्षण भिंत सायंकाळी कोसळली.
त्यामध्ये दोन महिला सापडल्या होत्या. त्यांना बाहेर काढून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील अश्विनी आनंदा यादव (वय ४५, कसबा बावडा) या महिलेचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला. संध्या प्रशांत तेली (वय ३० रा. वडणगे, ता करवीर) ही गंभीर जखमी झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आलेर आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली.
कोल्हापूर महापालिकेवर प्रश्नचिन्ह
कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारती काढून घेण्यासाठी महापालिका प्रशासन मोहीम राबवत असते. पण स्वमालकीच्या ऐतिहासिक वास्तूंची दुरवस्थेकडे लक्ष पुरवले जात नाही. या घटनेने दिव्याखालील अंधार अधोरेखित झाला आहे.