खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ज्योती नेमनदास नरसिंघानी (वय ४५, रा. लिश हॉटेल,कोल्हापूर) असे या मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी दुपारी तावडे हॉटेल उड्डाणपुलाखाली हा अपघात झाला.

ज्योती आपल्या दुचाकीवरून (एम एच ०४ डी कियू ७२५) गांधीनगर इथ नातेवाइकांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तिथून दुपारी एकच्या सुमारास त्या घरी परतत होत्या. त्या तावडे हॉटेल उड्डाण पुलाखाली आल्या असता रस्त्यातील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकची(एम एच ०४ बी यू ४८८८) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. या अपघातामध्ये ज्योती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर  ट्रक चालकाने पळ काढला. वर्दळीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

 खराब रस्त्याचा बळी

उड्डाणपुलाखालील रस्ता खराब झाला आहे, तो दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारक बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. मात्र प्रशासनान याकडे दुर्लक्ष करत असल्याने आज एका वाहनचालकाला आपला जीव गमवावा लागल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

 

Story img Loader