सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर यात्रेसाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन आराखडा राबविण्यावरून सिध्देश्वर मंदिर समिती व जिल्हा प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या वादातून मंदिर समितीने आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला आहे. रविवारी दुसऱ्या दिवशीही होम मदानावर सिध्देश्वर भक्तांचे चक्री उपोषण सुरूच होते. या आंदोलनास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. मात्र या आंदोलनातून अंग काढून घेतल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख हे सिध्देश्वर भक्तांच्या टीकेचे धनी ठरत आहेत.
होम मदानावर सिध्देश्वर यात्रेसाठी प्रशासनाने आपत्ती काळात पर्यायी म्हणून मोकळ्या ठेवलेल्या रस्त्यावर शासन व प्रशासनाच्या निषेधार्थ काल शनिवारी सिध्देश्वर भक्तांनी चक्री उपोषण सुरू करताच पोलिसांनी त्यास हरकत घेत तेथील मंडप उखडून टाकला होता. नंतर आंदोलकांचा रूद्रावतार पाहून पोलिसांनी नरमाई दाखवून मंडपाचा कापडी पडदा परत केला होता. या संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर रविवारी दुसऱ्या दिवशी आंदोलनस्थळी सिध्देश्वर भक्तांनी मोठी गर्दी केली. सिध्देश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या चक्री उपोषणात एक हजारापेक्षा अधिक सिध्देश्वर भक्तांनी सहभाग घेतला होता. भक्तांचा वाढता ओघ पाहून आंदोलनस्थळी सावलीसाठी कापडी छतांची उभारणी करून संपूर्ण रस्ता व्यापून टाकला होता. मात्र त्यास पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नाही.
या आंदोलनात जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. ‘जो हिटलर की चाल चलेगा, वह हिटलर की मौत मरेगा’ अशाही घोषणा दिल्या गेल्या. माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते, भाजपचे माजी आमदार शिवशरण पाटील, ज्येष्ठ नगरसेवक जगदीश पाटील, शिवसेना शहर प्रमुख प्रताप चव्हाण आदींसह वीरशैव िलगायत समाजातील शेकडो प्रतिष्ठित व्यापारी व कार्यकत्रे या आंदोलनात सहभागी झाले होते.
सिध्देश्वर यात्रा तोंडावर आली असतानाही मंदिर समिती व प्रशासन यांच्यातील तिढा न सुटता तो अधिकच जटील बनला आहे. तर याचवेळी सिध्देश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी देशमुख घराण्यातील असलेले सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सुरूवातीला सिध्देश्वर भक्तांच्या आंदोलनाचे नेतृत्व करून नंतर अचानकपणे त्यातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे ते आता टीकेचे धनी ठरत आहेत. त्यांचे राजकीय स्पर्धक तथा काँग्रेसचे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी पालकमंत्री देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडताना, त्यांनी पालकमंत्रीसारखेच जबाबदारीने वागावे, असा टोला लगावला.

Story img Loader