कोल्हापूर : ‘ आहुती ‘ आणि ‘ शिमगा ‘ या दोन महत्त्वाच्या संकल्पना आहेत. ‘ त्यांच्या ‘ आहुतीसाठी आमचे तयार झालेले बोकड पळवले जात आहेत. त्यांच्यापुढे गाजर दाखवले जात आहे. त्याने न बधल्यास भीती उभी केली जात आहे. यात आपला बळी जाणार हे कळूनही ते आहुती कडे वळत आहेत. त्यांच्या विरोधात आमचा शिमगा सुरू आहे. राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य गिळंकृत करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जातील. अशास्थितीत विचारीजणांनी आपला शिमगा अधिक तीव्र केला पाहिजे, असा परखड सूर रविवारी निमशिरगाव येथील परिसंमादात व्यक्त केला गेला .
” अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आजची परिस्थिती ” या विषयावर भाग घेताना साहित्यिकांनी सद्यस्थितीवर विविध दृष्टीकोनातून प्रभावी विचारांची मांडणी केली. अध्यक्षस्थानी धनाजी गुरव होते. हे चर्चासत्र आजच्या साहित्य संमेलनाला उंचीवर घेऊन जाणारे ठरले.
ज्येष्ठ पत्रकार आ. श्री. केतकर यांनी आजच्या भवतालातील धोके आणि त्याला ओळखण्याचे पर्याय सुचवले. धर्म, भाषा, जात, पक्ष, विचारसरणी यावर कसकसे आघात झाले आहेत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. ‘ अदृश्य ‘ आणि ‘ महाशक्ती’च्या अनेक कारणातून लोकांना गुलाम बनवण्याचे उद्योग कसे सुरु आहेत, हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
प्रा. गोमटेश्वर पाटील यांनी ‘ आहुती’ आणि ‘ शिमगा ‘ या संकल्पनाचा खुबीने वापर करीत सद्यस्थितीत तिरकस भाष्य केले. आमचे रेडे, बोकड, कोंबडी जे गेल्या 75 वर्षात तयार केले होते. धष्टपुष्ट केले होते. त्यांनाच आहुतीसाठी पळवले जात आहे. यासाठी पक्ष फोडले जातात. झुंजी लावल्या जातात. या विरोधात आपला शिमगा सुरू राहणार आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्ती विरोधात लढण्याचे आवाहन केले.
हेही वाचा >>> मेंदूला भूल दिलेल्या समाजाला साहित्यिकांनी जागे करावे – प्रवीण बांदेकर
पत्रकार मोहन हवालदार यांनीही सद्यस्थितीवर पोहोचले भाष्य केले. माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा त्यांनी उहापोह केला.
अध्यक्षीय मांडणी करताना धनाजी गुरव म्हणाले, त्यांनी प्रथम बुद्ध नंतर शिवाजी महाराज, तुकाराम यांच्यावर हक्क सांगितला. आता ते बाबासाहेब आंबेडकर पळवण्याच्या उद्योगात आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या क्लृप्ती वापरत आहेत. सगळीकडे आपली माणसं पेरायचे काम सुरू आहे. एवढ्याने भागले नाही तर नेते पळवले जातात. अशा महाशक्तींना सर्व शक्तीनिशी विरोध केला पाहिजे. यावेळी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ल्याचा निषेध करण्यात आला. प्रा. शामराव पाटील यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. रावसाहेब पुजारी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.