यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व थोर राजकारणी होते तेवढेच थोर साहित्यिकही होते असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
येथील श्री कालिकादेवी सहकारी पतसंस्थेतर्फे डॉ. मोरे यांना यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित होते. कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान, अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, की सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य हे दोन विचार समांतर चालता-चालता या दोन मतप्रवाहात संघर्षही होत राहिले. पण लोकमान्य टिळकांनंतर यशवंतराव चव्हाण यांनी दोन्ही विचारांमध्ये सुवर्णमध्य साधून महाराष्ट्र घडण्यासंदर्भात मतप्रवाह तयार केला. त्यांनी देशपातळीवर राज्याची ओळख निर्माण केली. यशवंतरावांनी सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करत राजकीय स्वातंत्र्यालाही प्राधान्य दिले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे.
यशवंतराव चहाण यांनी प्रतिकूल परिस्थितीत राज्याचे नेतृत्व करताना संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, जोतिबा फुले ही मुख्य प्रतीके मानली. मराठी माणसाला जे हवे ते आत्मसात करत साहित्य, कुस्ती, तमाशा, भजनाशी संगत केली म्हणूनच ते महाराष्ट्र समजू शकले आणि बदलूही शकले. महाराष्ट्राने वाचक बनावे, असा त्यांचा कायमच आग्रह होता. अनेक साहित्यिक, लेखक यांच्याशी त्यांची जवळीक होती. यशवंतरावांनी समाज स्वाभिमानी व चालला बोलता झाला पाहिजे हे महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिले. कोणताही एक विचार न घेता लोकहिताचा, समाजात विधायक बदल घडविणारा सामाजिक न्याय व स्वातंत्र्याचा विचार त्यांनी स्वीकारला हे त्यांच्या विचारांचे मोठेपणच भविष्यातील राजकीय नेतेपदाची चुणूक दाखवणारी होती. आदर्श काँग्रेस कार्यकर्ता कसा असावा, याचा आदर्श त्यांनी स्वत:हून कार्यकर्त्यांपुढे ठेवला. राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या विचारांचे लोक घडविले असेही त्यांनी नमूद केले. अनंत दीक्षित यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. अशोक चव्हाण यांनी केले. ज्येष्ठ संचालक बाबूराव सुर्वे, डॉ. संतोष मोहिरे, अरूण जाधव, राजन वेळापुरे यांची यावेळी उपस्थिती होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा