योगासने, ध्यान, व्याख्याने, मिरवणुका, प्रात्यक्षिके
योगच्या वाढत चाललेल्या आवडीचे दर्शन मंगळवारी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने घडले. योगासने,ध्यान, योगविषयक व्याख्याने, मिरवणुका , प्रात्यक्षिके आदी विविधांगी उपक्रम साजरे करताना करवीरनगरीसह अवघा जिल्हा ‘योग’मय झाला. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, एन.सी.सी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, मंडळे तसेच नागरिक प्रात्यक्षिकात सहभागी होत योगाच्या अनुभूतीचे साक्षीदार बनले.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, एन.सी.सी विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, मंडळांनी योग प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. विद्यार्थी, नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच त्यांच्याकडून योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली. शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्था तसेच जिल्हा परिषद, महापालिका, प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये १५० योग शिक्षकांनी शाळांमधील १५०० शिक्षकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. या शिक्षकांनी ८५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. हे सर्व जण जिल्ह्यांत, शहरांत मंगळवारी विविध ठिकाणी आयोजित योग वर्गामध्ये सहभागी झाले होते.
शिवाजी विद्यापीठात योग शिबिराची वर्षपूर्ती व आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचा ३४०० साधकांनी लाभ घेतला. पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे २१ जून, २०१५ पासून आजपर्यंत ‘योगशक्ती – योगयज्ञ’अंतर्गत ३६५ दिवस योग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. दैनंदिन २००हून अधिक साधकांनी लाभ घेतला. साधकांचा हा प्रतिसाद पाहता हे मोफत योग शिबिर पुढील वर्षभरही राबविण्याची घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद िशदे यांनी केली. या वेळी कणेरी येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामी, डॉ. व्ही.एन. िशदे, डॉ. डी.के. गायकवाड, डॉ. पी.टी. गायकवाड, माणिकराव पाटील-चुयेकर, डॉ. संदीप पाटील, साधक, शिक्षक, अधिकारी व सेवक उपस्थित होते. प्रशिक्षक दत्ता पाटील यांनी योग प्रात्यक्षिके करवून घेतली.
पोलिस ग्राऊंड येथील अलंकार हॉलमध्ये योग अभ्यासक डॉ. धनंजय गुंडे यांनी पोलिस कल्याण उपक्रमांतर्गत पोलिस अधिकारी व कुटुंबीयांना मार्गदर्शन केले. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह (कळंबा जेल) येथे बंदिजनांसाठी शाहिरी प्रबोधनाचा कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असता कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांच्या उपस्थितीत शाहीर रंगराव पाटील यांनी प्रबोधन केले. प्राचीन भारतीय संस्कृती विद्याकेंद्राचे नारायण साळुंखे गुरुजी यांचे व्याख्यानही पार पडले. बालाजी गार्डन येथे योग व ध्यानाची प्रात्यक्षिके योगपंडित रेखा खबाल यांनी केली.
योग विद्याधामतर्फे प्राचार्य डॉ. मुकुंद मोकाशी यांचे ‘आधुनिक जीवनशैली, योग आणि आयुर्वेद यांचे महत्त्व’ यावर व्याख्यान झाले. शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. श्री महालक्ष्मी योगा मंदिर, निसर्गोपचार केंद्र व अखिल भारत िहदू महासभा यांच्यातर्फे योग शिबिराचे आयोजन केले होते.
इचलकरंजीत उत्साह
राजाराम मदान येथे पावसाच्या सौम्य शिडकाव्यात भिजत योगसाधना करण्यात आली . उपस्थित नागरिक व महिलांनी योग प्रात्यक्षिके केली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देण्यात आलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय योग खेळाडू सुहास पवळे यांनी मार्गदर्शन केले. एक हजाराहून अधिक लोकांनी उपक्रमात भाग घेतला. मिरवणुका , प्रात्याक्षिके आदी उपक्रम पार पडले.