कोल्हापूर : महिन्याकाठी दहा-बारा हजार रुपयांचा खर्च करणे परवडत नाही. हा स्पर्धा परीक्षेचा नाद सोड आणि एखादी बऱ्यापैकी नोकरी कर, असा परखड सल्ला वडिलांनी त्याला दिला. पण त्यास तो बधला नाही. त्याची जिद्द कायम होती. या कष्ठाला आज गोड फळ लगडले. मेंढपाळाचा मुलगा असलेला बिरदेव सिद्धाप्पा डोणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अत्यंत कठीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्पर्धेत ५५१ क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याच्या यशाचे वृत्त गावात समजताच अवघ्या यमगे गावात आनंदाचे उधाण आले. दरम्यान जिल्ह्यातील फुलेवाडी येथील हेमराज हिंदूराव पणोरेकर यानेही ९२२ क्रमांकाने या परीक्षे यश संपादन केले आहे. सन २०२४ मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये बिरदेव उत्तीर्ण झाल्याचे समजताच यमगे येथे जल्लोष करण्यात आला.
बिरदेवचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कागल तालुक्यातील यमगे गावात तर उच्च माध्यमिक शिक्षण मुरगूडमध्ये झाले. बिरदेवने दहावी- बारावीच्या परीक्षेमध्ये मुरगूड केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. गणित विषयात दोन्ही परीक्षेत शंभरपैकी शंभर गुण मिळाले होते. पुण्यात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने दिल्लीमध्ये केंद्रीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. दररोज २२ तास अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची. वडिलांनी मेंढपाळ व्यवसाय करीत आपला मुलगा बिरदेव याला उच्चपदस्थ अधिकारी बनविण्याच्या उद्देशाने शिक्षण दिले. आजही आई -वडील बेळगाव भागात बकऱ्यांचा कळप घेऊन गेले होते. बिरदेवचा भाऊ वासुदेव हा चार वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला असल्याने बिरदेवच्या शिक्षणासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत मिळू शकली. आई बाळाबाई व विवाहित बहीण, भाऊ, वडील असे त्याचे कुटुंब आहे.
यशाचा विश्वास
अलीकडेच काही दिवसांपूर्वी माझे ध्येय अंतिम टप्प्यात आले आहे. लेखी परीक्षा, मुलाखत उत्तम प्रकारे पार पडले असल्याने यश निश्चितपणे मिळेल, असा विश्वास बिरदेवने अलीकडे त्याच्या मित्रांकडे बोलताना व्यक्त केला होता.
कोल्हापूरचे दुहेरी यश
फुलेवाडी येथील हेमराज हिंदूराव पणोरेकर याने ९२२ क्रमांकाने हे यश संपादन केले आहे. हेमराजचे वडील हे निवृत्त लिपिक आहेत तर आई गृहिणी आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहयोगातून महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना दिल्या जात असणाऱ्या या शिष्यवृत्तीमधून बिरदेव व हेमराज उत्तीर्ण झाले असल्याचा दावा केंद्र संचालक राजकुमार पाटील यांनी केला आहे.